सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांनाही सोडले नाही

भक्ती-शक्ती शिल्पासाठीचा निधी वळविला

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. निवडणुकीच्या वेळी महाराजांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवाजी महाराजांचा आदर नसून शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या शिल्पासाठी असलेला निधी रस्त्यासाठी वळविण्यात आल्याने त्यांचा बुरखा फाटला असून खरा चेहरा उघडा पडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला आहे.

जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये भक्ती शक्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी तरतूद केलेला निधी रस्त्याच्या कामासाठी वळविण्यात आला. त्यासाठी उपसूचना देऊन विषय गोंधळामध्ये मंजूर करून घेतला. त्याबाबत मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील आरोप केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक पंकज भालेकर उपस्थित होते.

मिसाळ म्हणाले, शिवाजी महाराज सर्वांचे आदर्श आहेत. त्यांच्या शिल्पाचे सुशोभीकरण व्हावे, ही शहरवासियांची इच्छा आहे. आपल्या शहराच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्मारक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी सुशोभीकरणाचा निधी महापौरांच्या प्रभागात वळवून घेतला आहे. या प्रभागामध्ये चारही नगरसेवक भाजपाचेच आहेत. ज्या रस्त्यासाठी अद्याप जमिनही ताब्यात नाही त्यासाठी निधी वळविला आहे. ज्या महाराजांचे नाव घेऊन यांनी महापालिका निवडणूक लढविली, त्या महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी असलेला पैसा देखील सत्ताधाऱ्यांना कमी पडत असल्याचा आरोपही मिसाळ यांनी केला.

टीका करणे विरोधकांचे काम आहे
सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. सागंवीमध्ये जी कामे सुरू आहेत त्यासाठी निधी वळविला नाही. तो आमचाच रीतसर निधी आहे. सर्व कामे रीतसर सुरू आहेत. आक्षेप घेणे, आरोप करणे हे त्यांचे काम आहे.

– माई ढोरे, महापौर 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.