ऑस्ट्रेलिया महिला संघाचा विश्‍वविक्रम

न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव करत सलग 22 वा विजय

माउंट मॉंगुनुई – पहिल्या एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने न्यूझीलंडला 6 विकेट्‌सने मात दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 213 धावांचे आव्हान 38.3 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघाने सलग 22 व्या एक दिवसीय सामन्यांमध्ये विजयाची नोंद करत नवीन विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे.

रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव 48.5 षटकांमध्ये 212 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 4, तर निकोला कॅरीने 3 बळी घेतले. न्यूझीलंडने दिलेले 213 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने लिलया पार केले. ऑस्ट्रेलियाकडून एलिया हिली (65), एलिस पेरी (नाबाद 56) आणि ऍश्‍ले गार्डनर (नाबाद 53) या तीन खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आपल्याच देशाच्या पुरुष संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडला आहे. रिकी पॉण्टिंगने 2003मध्ये सलग 21 वन-डे सामने जिंकून विक्रम केला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, नेदरलॅंड, न्यूझीलंड, केनिया आणि वेस्ट इंडीजच्या संघाला पराभूत केले होते.

याआधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सलग 21 विजय मिळवण्याचा विक्रम 2018 साली केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघाचा एक दिवसीय मालिकेत 3-0 पराभव करत हा विक्रम नोंदवला होता. ऑस्ट्रेलियासह भारताच्या महिला संघाने देखील 2016-17 मध्ये सलग 16 विजय मिळवण्याची कामगिरी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.