पुणे – नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्वाचा

– कल्याणी फडके

पुणे – सुमारे दीड शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या नाटक कलेने आज 21 व्या शतकातही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. सुरूवातीला लहान स्वरूपात सादर होणारे हे मनोरंजनाचे माध्यम आज विविध पातळ्यांवर पोहोचले आहे. एकांकिका, नाट्य स्पर्धा, नाटय महोत्सव आणि अन्य करंडकांच्या स्पर्धांमुळे नाटकाचा सविस्तर विस्तार होण्यास मदत होते. आजच्या काळात नाटक आणि तरुणाई हे समीकरण नव्याने रूढ होताना दिसते. यामध्ये तरुणांचा सहभाग वाढणे ही लक्षणीय गोष्ट आहे, पण या होणाऱ्या स्पर्धांबाबतची मते, नाटकामागची भूमिका आणि गणिते यांबद्दल “दै.प्रभात’च्या प्रतिनिधीने कलाकार आणि प्रेक्षकांशी संवाद साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिथे नाट्य सादरीकरणासाठी इत्यंभूत कार्य प्रयोग तत्त्वावर घडते ते “प्रायोगिक’ तर, जिथे सर्व गणिते आखून नाट्य आणि इतर बाबींमधून प्रेक्षक वर्ग सांभाळला किंवा गुणला जातो ते “व्यावसायिक’ नाटक म्हणायला हरकत नाही. प्रायोगिक नाटक पाहणारे 90 टक्‍के प्रेक्षक हे कलाकारच असतात आणि इतर 10 टक्‍क्‍यांमध्ये त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी असतात. त्याची गणिते “ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर असतात. याचेच कारण त्याला लाभलेला प्रेक्षक वर्ग आणि त्यांची झालेली जाहिरात असू शकते. दुसरीकडे पाहिले, तर व्यावसायिक रंगभूमीला लाभलेले कलाकार देखील अनुभवी आणि नामांकित असल्याकारणाने त्याच्या प्रसिद्धीला मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो आणि त्यामुळेच चांगला प्रतिसादही मिळतो. आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक नाटक चांगल्या प्रकारे रक्‍कम मिळविण्यात दोन पावले पुढे आहे हे खरेच आहे. मोठे कलाकार आणि मोठी तिकीट तसेच जाहिरातीतून मिळालेली साथ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.

प्रायोगिक नाटकांमुळे कलाकार घडतात हे विधान दिवसेंदिवस खरे ठरते आहे. कारण नवीन कलाकार प्रायोगिक रंगभूमीवर उतरून घडत आहेत. या कारणास्तव स्पर्धा देखील वाढल्या आहेत. एका वर्षात जवळपास 50 पेक्षा अधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात.
– संकेत अनगरकर, कलाकार


नाटकासारखे सादरीकरणाचे शुद्ध आणि सुंदर माध्यम नाही. प्रायोगिक हे नवोदित कलाकारांचे व्यासपीठ आहे. अनेक स्पर्धांच्या माध्यमातून नाटके पुढे येतात आणि याद्वारे घडलेले अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिक ही प्रायोगिक पेक्षा सरस असतात, कारण त्यांच्या आर्थिक गणितांचे नियोजन ठरलेले असते. कलाकारांचे मानधन, जाहिरात, नेपथ्य, रंगभूषा आदी तांत्रिक गोष्टींच्या आर्थिक गणितांचे नियोजन ठरलेले असते. पण प्रायोगिकचे तसे नसते. प्रायोगिकमध्ये बऱ्याचदा प्रत्येक कलाकार आपल्या खिशातून आर्थिक गणिते सोडवत असतो. याचा विचार करता प्रेक्षकांनी देखील प्रायोगिक रंगभूमीला प्रतिसाद देणे गरजेचे आहे, वास्ताविक पाहता तो अगदीच कमी स्वरूपामध्ये मिळतो. प्रायोगिक नाटकांना कलाकारांचा ओळख असणारा प्रेक्षक वर्ग जास्त असतो. मात्र, प्रेक्षकांनी व्यावसायिकप्रमाणे प्रायोगिकलाही प्रतिसाद द्यावा.
– स्वप्ना दुर्वे, निर्माती


प्रायोगिक पेक्षा व्यावसायिक नाटके पाहण्यात प्रेक्षकांचा जास्त कल असतो. पण गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड थोडा बदलतो आहे, असे मला वाटते. विशेषतः तरुणवर्ग सादरीकरण आणि प्रेक्षक अशा दोन्ही अर्थांनी प्रायोगिक नाटकांकडे वळला आहे. त्याचबरोबर प्रत्येकवेळी प्रायोगिक नाटकांच्या संहिता आणि आशय सर्वांना समजतोच असे नाही. मला दोन्हीही नाट्य प्रकार पाहायला आणि अनुभवायला आवडतात; पण जास्त कल हा अर्थात प्रायोगिककडे असतो.
– संदेश कुलकर्णी, प्रेक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)