भुईंज- भुईंज येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत भुईंज पोलिस ठाण्यातील हवालदार प्रवीण ढमाळ यांच्या विनोद किसन माने (वय 40, रा. भुईंज) याने दगड डोक्यात घालून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत हवालदार ढमाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. ढमाळ यांना उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी माने याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
भुईंज, ता. वाई येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक महामार्गाच्या बाजूने गावात निघाली होती. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण ढमाळ व इतर पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक महालक्ष्मी स्विट होम समोर आली. त्यावेळी प्रवीण ढमाळ हे रस्त्याकडेच्या कट्ट्यावर बसले असताना विनोद किसन माने हा हातात दगड घेऊन आला आणि अचानक त्याने ढमाळ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यावेळी पीएसआय दुर्गानाथ साळी आणि सहकाऱ्यांनी त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.