हल्ला पिचड पिता-पुत्रांवर, टार्गेट मात्र विखे पाटील 

प्रा.डी.के.वैद्य
अकोले  – तालुक्‍यातील संघर्षमय अशी राजकीय निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक ही समसमान पातळीवर आल्याने पुढील तीन दिवसांच्या काळामध्ये नेमके कोण कशा पद्धतीने विजयाच्या समीप जाणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. मात्र हल्ला पिचड पिता-पुत्रांवर आणि रोख मात्र विखे पाटलांवर आहे. त्यामुळे या लढतीला खरेतर पिचड विरुद्ध लहामटे-भांगरे असे जरी सकृतदर्शनी चित्र उभे राहिले असले, तरीही लढतीचे खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील चित्र म्हणजे पवार विरुद्ध विखे अशी लढत अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे.

पिचड पिता-पुत्रांचे पक्षांतर अनेक कारणांनी गाजले. चाळीस वर्षे शरद पवार यांनी त्यांना लाल दिवा व अन्य पदे दिली. तरीही पिचड यांनी पक्षांतर केले. त्यामुळे त्यांनी केलेले पक्षांतर हे सध्या राजकीय वर्तुळामध्ये आघाडीच्या दृष्टीने टीकेचे केंद्रबिंदू बनले आहे. हे जरी खरे असले तरी हे सर्व राजकीय वातावरण बदलवणारे बडे नेते व विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यामागे आहेत. पण पक्षांतरामागची कारणे अनेक असतील व आहेत. पण 12 विरुद्ध 0 अशी निकालाचे भाकित करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरळ सरळ आघाडीच्या नेत्यांना शिंगावर घेतले आहे. ते आपली राजकीय भूमिका म्हणून गेले, पण त्यामध्ये पिचड यांचे विजयाचे चक्र हे अधिक क्‍लिष्ट बनत चालले आहे, एवढे मात्र निश्‍चित.

महायुतीच्या वतीने माजी आमदार वैभव पिचड यांना उमेदवारी मिळाली. पण शरद पवार यांनी आपल्या आघाडीच्या धर्माला पालन करण्याच्या दृष्टीने बाळासाहेब थोरात यांना ही साकडे टाकले आहे. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डी, अकोले, कोपरगाव, राहुरी, कर्जत-जामखेड या ठिकाणच्या लढती या रंगतदार वळणावर येऊन ठेपल्या आहेत. याचे केवळ कारण तेथील स्थानिक उमेदवार महत्त्वाचा नसून विखे यांच्या घोषणेला पूर्णपणे छेद देण्याच्या दृष्टीने ही सर्व पडद्याआड आघाडीची भूमिका आहे. थोरात यांचीही त्यांना साथ आहे.

“सत्तेची मस्ती आली’ आहे. ही मस्ती जर जिरवायची असेल तर विखे यांचे नाव न घेता जे जे उमेदवार आघाडीच्या विरोधात आहेत. त्यांच्यावर हल्लाबोल करायचा आणि विखे यांना पर्यायाने एकेक उमेदवार महायुतीचा अंगणामध्ये सपशेल पराभूत करून जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर राज्याच्या राजकारणातूनही विखेंना कसा शह देता येईल? यादृष्टीने ही व्यूहरचना आहे आणि त्यामुळेच अकोले तालुका या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही त्यामुळेच रंगतदार बनली आहे.

पिचड महायुतीत आले. पर्यायाने ते भाजपत आले. तर एकेकाळी महायुतीत म्हणजे भाजपमध्ये असणारे अशोक भांगरे, किरण लहामटे, सुनीता भांगरे हे आघाडीकडे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. खरेतर दोन्हीही गटांनी पक्षांतरे केली आहेत. पण पक्षांतर आपण केले याचा सोयीस्कर विसर अशोक भांगरे, किरण लहामटे व त्यांच्या सहकाऱ्यांना झाला असून पिचड यांचे पक्षांतर म्हणजे शरद पवार यांच्या विरुद्धची गद्दारी असे गोंडस प्रचाराचे सूत्र भावनिक बनवले आहे. हे सूत्र सामान्यांच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण त्या पाठीमागे ‘सॉफ्ट टार्गेट’ हे पिचड नाहीतच. तर खरे केंद्रबिंदू राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील हे आहेत हे फार थोड्या लोकांच्या लक्षात आले असेल. 12 विरुद्ध 0 अशी ललकारी देणाऱ्या विखे पाटलांनी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना शिंगावर घेतल्याने थोरातही बिथरले आहेत.

त्यांनी विखे यांच्या साम्राज्यात हस्तक्षेप करून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश थोरात उभे केले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधी गटाचे आमदार असल्यामुळे विकास कामे झाली नाहीत. या मुद्‌द्‌यावर पिचड व त्यांचे समर्थक आपले ‘प्रचार लाईन’ आखून घेत आहेत व त्यात सातत्य बाळगून आहेत. शिवाय समोरच्या आघाडीच्या गटातील आरोपाला उत्तर देताना चाळीस वर्षात पिचड यांनी काय केले? या आरोपाला उत्तर देताना अगस्ती सहकारी साखर कारखाना अकरा महिन्यांमध्ये याच मधुकरराव पिचड यांनी उभा केला.

याच मधुकरराव पिचड यांच्या दूरदृष्टीमुळे घाटघर जलविद्युत प्रकल्प उभा राहिला. याच मधुकरराव पिचड यांच्यामुळे निळवंडे धरण उभे राहिले. याच मधुकरराव पिचड यांच्यामुळे. पिंपळगाव खांड धरण हे अस्तित्वात आले. छोटे-मोठे धरणे व पाझर तलाव यामुळे पाण्याचे साठे वाढले. पाणी आणि अन्य काही विकासाचे मुद्दे त्यांनी आपल्या प्रचारामध्ये ठेवले आहेत. त्यामुळे पिचड-लहामटे ही लढत आता आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असतानाही खऱ्या अर्थाने अकोलेची लढाई विखे आणि पवार यांच्या मध्येच होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विखे- पवार या लढाईमागे खरे सूत्र असल्याने अकोले तालुक्‍याची निवडणूक राज्यात आज चर्चिली जात आहे.ती संघर्षमय बनली आहे ती या एकमेव कारणामुळे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)