थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

मलकापूर पालिका विशेष सभेत अधिकाऱ्यांची माहिती

कराड – मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात वसुलीचे शंभर टक्‍क्‍यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच सहकार्याची भूमिका बजावावी. पालिकेचा कर थकितदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती मुख्य वसुुली अधिकारी राजेश काळे यांनी पालिकेच्या विशेष सभेत दिली. वसुलीच्या कारवाईबरोबरच थकबाकीदारांच्या नावाचे फलक चौकात लावण्यासह थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच घरासमोर बॅण्डबाजा लावून वसुली करीत थकबाकीदारांवर शासन नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजिवनी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष सभेत वसुलीबाबत माहिती देताना काळे म्हणाले, आत्तापर्यंत 80 टक्के वसुली पूर्ण झाली असून 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. 90 टक्के वसुली पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाचा लाभ मिळतो. कर वसुलीसाठी शासनाने कडक धोरण राबवले असून स्थावर व जंगम मालमत्तेवरही जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

यामध्ये नळ कनेक्‍शन कट करणे, थकबाकीदारांची यादी करुन शहरातील प्रमुख चौकांमध्ये फलकांवर लावणे, थकबाकीदाराच्या घरासमोर बॅंड वाजविणे, नगरपालिकेचा बोजा थकबाकीदाराच्या मालमत्तेवर नोंद करणे अशा स्वरुपाच्या कारवाया करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सध्या रिक्षाद्वारे अनाऊन्सिंग करुन कर भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. शासनाच्या नियमानुसार कडक धोरण राबवून कारवाई करत असताना अनेक लोक नाराज होतात, ही वेळ लोकांवर येऊ नये म्हणून त्यांनी वेळीच कर भरुन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वसुली विभागाने केले आहे.

नगरसेवकांनी थकबाकीदारांची यादी बघून आपल्या वॉर्डमधील आपल्या जवळचा कोणी व्यक्‍ती असल्यास त्याला कर भरण्याबाबत सूचना कराव्यात. कर वसुलीबाबत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कारवाई करत असताना दोन वर्षांपेक्षा जास्त कर थकीत असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यावेळी मार्च महिन्यातील चार दिवस राहिले असताना याबाबत सभागृहात होणारी चर्चा ही एक महिन्यापूर्वीच व्हायला हवी होती, असे मत विरोधकांनी मांडल्यावर हा प्रशासनाचा भाग असून सभागृहाच्या माहितीसाठी या विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती उपनराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

सांडपाणी प्रक्रिया योजनेवर चर्चा करताना मुख्य पाईपलाईनला घरातील सांडपाणी जोडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे सांगत नवीन योजनेसाठी जोडणी करत असताना लोकांनी सेफ्टी टॅंक स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावर काही ठिकाणी नवीन जोडणीचे चेंबर तुंबले जात असल्याच्या तक्रारी आल्याची बाब विरोधकांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर मनोहर शिंदे म्हणाले, शहरातील सुमारे 800 प्रॉपर्टी स्वच्छ करायच्या आहेत. सर्व ठिकाणी नगरपालिकेमार्फत स्वच्छता करणे शक्‍य नसल्याने हे काम एखाद्या एजन्सीमार्फत करण्याचा विचार आहे. ते काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असल्याने प्रबोधन करणे गरजेचे आहे.

सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल? त्याला काही मुदत आहे का? असा प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित करताच ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली तेथील काम पूर्ण झाले. परंतु जेथे जागा उपलब्ध नाही तेथील काम अपूर्ण असून ते काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)