इच्छुकांच्या लगीनघाईमुळे विधानसभेला धांदल?

शिरूर- हवेलीतील आखाड्यात तीन दिग्गजांची नावे चर्चेत : राष्ट्रवादी कॉंग्रेस बांदल उडविणार काय धांदल

– मुकुंद ढोबले

शिरूर – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीच्या विजयानंतर अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. हवेली तालुक्‍यातील 38 गावांचा समावेश करून निर्माण झालेल्या मतदारसंघात हवेलीचा नारा घुमणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांमुळे हायकमांडची उमेदवारी जाहीर करताना “धांदल’ उडणार आहे. यात उमेदवारी डावलल्यास तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक दोन्ही डगरीवर हात ठेऊन आहेत.

शिरूर तालुक्‍यातील राजकीय पटलावर सध्या भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्यात लोकसभेपासून धूसपूसचे राजकारण सुरू आहे. या दोघांचे निकटवर्तीय असणारे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार पाचर्णे यांची ताकद कमी होताना दिसत आहे.

माजी आमदार अशोक पवार यांच्या पक्षातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या दोघांची निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादीकडूनही बांदल इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे टेंशन वाढले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची नेत्याची एकजूट पाहायला मिळाली. एकीचे बळ मिळते फळ याची प्रचिती कोल्हे यांच्या विजयातून मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर- हवेलीतून सव्वीस हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. या निकालातून राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीत ताकद वाढविणारी आहे.

शिरूर- हवेली असा दोन तालुक्‍याचा संगम साधून शिरूर मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. यात भाजपचे आमदार पाचर्णे, राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्यात लोकप्रिय.. कार्यसम्राट,.. वाळूनेते..कर्जसम्राट, अशी चर्चा सुरू आहे. इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. आखाड्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल हे दंड थोपडून तयार आहेत.

आमदार पाचर्णे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या काळात हजारो कोटींची विकासकामे केल्याचा दावा केला आहे. ही कामे हवेली- शिरूर तालुक्‍यात केली आहेत. परंतु ही कामे विरोधकांना दिसत नाही, अशी चर्चा सुरू आहे. शिरूर तालुक्‍यातील साखर कारखाना, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी- विक्री संघ निवडणुकीत भाजपाचे कमळ कोमेजले आहे. आमदार पाचर्णे यांच्या पदरी दारूण अपयश आले.

राष्ट्रवादीचे माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी तालुक्‍यात स्थानिक स्वराज्य संस्था खेचून आणल्या आहेत. या सत्ता समीकरणातून विधानसभेला बेरजेचे गणित मांडले जाते. यात राष्ट्रवादीची बाजू भक्‍कम मानली जात आहे. पवार यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकासकामे आजही मतदारराजला भावतात, अशी चर्चा सुरू आहे. तालुक्‍यात राष्ट्रवादीचे बस्तान बसविले असले तरी त्यांच्यावर राष्ट्रवादीतील काही नेते, पदाधिकारी नाराज आहे. शिरूर- आंबेगाव असा वाद सुरू झाला आहे. यातून त्यांना विरोध होत असला तरी पवार यांनी चाणाक्ष बुद्धीने राजकीय हवेची दिशा बदलून टाकली आहे. त्यातून राष्ट्रवादीला लाभ मिळणार आहे.

हवेली तालुक्‍याचे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात विकासकामे केली आहेत. या बळावर ते शिरूर- हवेली तालुक्‍यात बस्तान बसवण्याची काम करीत आहे. कंद यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उमेदवारी भेटली नाही तर ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे पुन्हा राजकारणाचा दिशा हवेलीकडे सरकू लागली आहे. त्यामुळे विधानसभेच्या चक्रीवादळात राजकीय हवा तापली आहे.

मंगलदास बांदल यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम समितीचे सभापती असतानाच केलेली विकासकामे हेच त्याचे प्रमुख भांडवल आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाचे श्रेय घेत आहे. परंतु माजी आमदार अशोक पवार यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा बालेकिल्ला शिरूर पंचक्रोशीत व शहरात उद्‌ध्वस्त करून पूर्व भागातही मताधिक्‍य दिले आहे. त्यामुळे कोल्हे यांचा विजयरथ पुढे गेला हे विसरुन चालणार नाही. आमदार पाचर्णे यांना आपला गड शाबूत ठेवण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना मताधिक्‍य मिळाले. तेथे ते बुजविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आढळराव यांची नाराजी असली तरी पाचर्णे यांच्यावरही नाराजी आहे, हे नाकारून चालणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.