आनंदाने जगण्याची कला

सकाळची वेळ होती. ऑफिसला जायची लगबग होती. तशी त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी होती; परंतु अचानक काही महत्त्वाचे काम निघाल्याने आज ऑफिसला जावेच लागणार होते. सर्व कामे घाईगडबडीत उरकून नाश्‍ता करायला बसलो होतो. माझ्या साडेतीन वर्षांच्या कन्येची माझ्या अवतीभोवती लुडबुड सुरू होती. मी नाश्‍ता करीत असताना माझ्या कन्येने म्हणजेच परीने मला विचारले, पप्पा माझ्यासोबत खेळणार काय?

मी तिला समजावत म्हणालो, बाळा मला ऑफिसला जायचे आहे.
त्यावर ती लगेच म्हणाली, पण आज सुट्टीच्या दिवशी तुम्ही ऑफिसला का चालले आहात?
मी म्हणालो, बाळा, मी ऑफिसला नाही गेलो तर मग घरात पैसे कुठून येणार आणि पैसे नाही आले तर मग मी माझ्या परीचे लाड कसे पुरविणार?
नाजूक स्मितहास्य करीत ती पुन्हा म्हणाली, मग तुम्ही ऑफिसला गेल्यावर तुमच्याकडे खूप पैसे येणार ना?
मी म्हणालो, हो, खूप पैसे येणार.
त्यावर ती म्हणाली, मग त्याचे तुम्ही काय करणार?
मी म्हणालो, तुला शिकवून मोठे करणार, तुझे स्वप्न पूर्ण करणार. त्यावर परी लगेच म्हणाली, मग ते झाल्यावर अजून काय करणार? मी म्हणालो, मग अजून पैसे कमवणार आणि नवीन बंगला, गाडी सर्व घेणार. माझ्या या उत्तरानेही तिचे समाधान झाले नव्हते. परीच्या आणि माझ्या संवादात जणू एक प्रश्‍नपत्रिका माझ्यासमोर होती आणि त्यांची सारी उत्तरे मी देत बसलो होतो. तिने पुन्हा एक प्रश्‍न विचारला, मग त्यानंतर काय करणार? आता या उत्तराने तिची प्रश्‍नमंजुषा थांबेल अशा अविर्भावात मी तिला उत्तर दिले, मग तुझी मम्मी आणि मी निवांत आरामात राहणार.
एवढ्यावर थांबेल ती परी कसली. ती तत्काळ म्हणाली, ते सर्व ठीक आहे पण तोपर्यंत मी मोठी होणार. मग माझ्याशी तुम्ही कसे खेळणार? त्यापेक्षा आताच सुट्टी घ्या, आराम करा, माझ्याशी थोडे खेळा ना!
तिच्या या वाक्‍यांनी आता मात्र मी विचारात बुडून गेलो. आज साडेतीन वर्षांची ती निरागस मुलगी किती सत्य बोलून गेली. आज माझ्याप्रमाणेच असंख्य लोक असेच जीवन जगत आहेत. जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची ओझी घेऊन जगताना आपण आपल्या सुखाकडे किती दुर्लक्ष करतो ना? निवृत्तीनंतर निवांत समाधानाचे जीवन जगण्याची स्वप्ने पाहणारे आपण आयुष्याला किती व्यस्त करतो ना!

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. थांबला तो संपला हे वाक्‍य प्रमाण मानून आपल्या आनंदालाही पर्यायाने थांबवित आहोत याचे भानही आपल्याला नसते. वयोमानानुसार आनंदाची व्याख्या आणि संकल्पना बदलत जातात. निवृत्तीनंतर पुन्हा नातवंडे सांभाळताना सुखाचे निवांत चार क्षण मिळतीलच याची काय खात्री?

आपण आपल्या जगण्यातला निवांतपणा आणि जगण्याचे अविस्मरणीय क्षण या धावपळीत हातचे गमावत आहोत.
या स्पर्धेत प्रत्येकाला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला एक स्वप्न पूर्ण झाल्यावर पुढचे स्वप्न पाहून ते पूर्ण करायचे आहे. आनंद, समाधान, निवांत क्षण, छंद, कला आणि आपल्याला द्यावयाचा वेळ अशा कितीतरी गोष्टी विसर्जित होत आहेत. भौतिक सुखासाठी प्रत्येकाला पळायचे आहे पुढच्याला मागे टाकायचे आहे, पण कितीही पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असणारच ना? आपल्या ध्येयावर आणि जगण्यावर या दोहोंवर आपल्याला लक्ष केंद्रित करता यायला हवे. आपल्या ध्येयाला आणि कर्तृत्वाला गती नक्कीच हवी; परंतु ती गती आपल्या प्रकृतीला आणि जगण्याला साजेशी हवी. विनाकारण भविष्याबाबत असुरक्षिततेची भावना ठेवून वर्तमानाचे सुख हरवून बसण्याला काहीही अर्थ नाही.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर भौतिक स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद वाटेल; परंतु आयुष्यात खूप काही करायचे राहून गेले याची खंत मात्र पुसता येणार नाही. कवयित्री इंदिरा संत यांनी यावर उत्तम भाष्य केले आहे. किती राहून गेलेले, ठरवलेले, न ठरवलेले, कल्पनेतही न आलेले, अदृष्टात लपवलेले. यातून आपल्याला बरेच काही समजून जाते.

ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात स्वप्ने, ध्येय आणि त्यांच्या पूर्तीसाठी जशा जबाबदाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे आपले आयुष्य आहे ते आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी. निखळ आनंद देणारे तारुण्यातील आपले ते ऊर्जादायी व्यक्तिमत्त्व उतारवयात पैसे मोजूनही परत मिळविता येत नाही. ऐन तारुण्यात शक्ती असते पण पैसा नसतो. त्यानंतर तिशीत शक्ती असते, पैसाही असतो पण स्वतःसाठी अन्‌ आरोग्यासाठी वेळ नसतो. उतारवयात मात्र वेळच वेळ असतो, पैसाही असतो पण त्याचा आनंद घ्यायला ती शक्ती, तो उत्साह आणि ती ऊर्जा नसते. या आयुष्यातील क्षणांचा सुवर्णमध्य आपल्याला साधता आला पाहिजे. शेवटी आजारी पडून, शस्त्रक्रियेच्या अंथरुणात निपचित पडून, निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काय उपयोग. आता गरज आहे ती हे समजून आयुष्यातील प्रत्येक आनंदाचे क्षण जगण्याची. स्वतःला आणि इतरांना आनंदाने आणि ऋणानुबंधाने जोडण्याची.

सागर ननावरे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.