दररोज 250 ते 300 टन आवक : करोनामुळे खरेदीरांकडून पाठ
पुणे – वाढलेली लागवड, भरपूर झालेला पाऊस यामुळे यंदा कलिंगडाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील फळ विभागात कलिंगडाची आवक वाढली असून, परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत कलिंगडला 25 टक्के कमी भाव मिळत आहे. गेल्यावर्षी घाऊक बाजारात किलोस 13 ते 14 रुपये भाव मिळत होता. सोमवारी किलोस 8 ते 11 रुपये भाव मिळत होता. मंगळवारी बाजारास सुट्टी होती. करोनामुळे खरेदीदारांनी पाठ फिरविल्यामुळे तो भाव बुधवारी 7 ते 9 रुपयापर्यंत खाली आल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
गेल्यावर्षी बाजारात दररोज 150 ते 200 टन कलिंगडाची आवक होत होती. ती यावर्षी 250 ते 300 टन होत आहे. सोलापूर, सातारा जिल्हा, नगरमधील कर्जत तालुका आणि जिल्ह्यातून बारामती, जेजुरी भागातून कलिंगडाची आवक होत आहे.
दहा दिवसांच्या तुलनेत आवक वाढली आहे. दहा दिवसांतही कलिंगडाच्या भावात घसरण झाली आहे. यंदा पाऊस चांगला झाला असून, 60 ते 90 दिवसांत कलिंगडाचे पीक होते. त्यामुळे अधिक लोकांनी कलिंगडाची लागवड केली आहे. त्यामुळे अधिक आवक होत असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.
मी चार एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. यंदा पीक चांगले आहे. अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या मिळत असल्यापेक्षा आणखी थोडा जास्त म्हणजे किमान दोन आंकी भाव मिळावा, ही अपेक्षा आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल.
– शुभम लवांडे, भोरवाडी, जेजुरी