पुणे : गावरान आंब्याचा हंगाम सध्या बहरला आहे. मार्केट यार्डात या आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी (दि. 12) फळबाजारात तब्बल साडेचार ते पाच हजार क्रेट आंब्याची आवक झाली. पुढील 15 ते 20 दिवस हंगाम सुरू राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रत्नागिरी, कर्नाटकनंतर नागरिक गावरान आंब्याची आवर्जून वाट पाहत असतात. गावरान हापूसबरोबरच पायरी, केशर आणि गोठी आंबा बाजारात दाखल होत आहे. तयार मालाचीही आवक होत आहे. तयार हापूस आंब्यास डझनास 200 ते 500 रुपये भाव मिळाला. तर पायरी, गोठी आंब्यास डझनास अनुक्रमे 200 रुपये आणि 30 ते 100 रुपये भाव मिळाला. तर केशरला किलोस 60 ते 70 रुपये भाव मिळत आहे.
मार्केट यार्डात रविवारी गावरान कच्च्या हापूसला किलोला विक्रमी 151 रुपये उच्चांकी भाव मिळाला. जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, इंदापूर, बारामती भागांतून हा आंबा मार्केट यार्डात दाखल होत आहे. या आंब्याला चांगली मागणी आहे.
– युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड
अनेक नागरिक आवर्जून गावरान आंब्याची वाट पाहत असतात. येथील बाजारात रविवारी गोड, नैसर्गिकरित्या पिकलेल्या सुमारे 400 डाक आंब्याची आवक मार्केट यार्डात झाली. तुलनेने भाव जास्त मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.
– यशवंत कोंडे, व्यापारी, मार्केट यार्ड