चिमुकल्यांच्या आगमनाने आनंदल्या “शाळा’

सुट्टी संपली : पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप  

पिंपरी  – उन्हाळी सुट्ट्या संपून सोमवारी (दि. 17) महापालिका व अन्य मराठी माध्यमांच्या शाळांना सुरवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी महापालिका शाळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औंक्षण, कुकुंमतिलक करण्यात आले. त्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद छटा झळकली. शाळांकडून परिसरात फेरी देखील काढण्यात आली.

उन्हाळी सुट्ट्यांमधील धमाल संपून आता मुलांच्या शाळांना पुन्हा सुरवात झाली आहे. दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत नव्या इयत्तेत प्रवेश केला. काही चिमुकल्यांनी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहुल, आनंद, नवीन शाळेविषयीची असलेली ओढ पाहण्यास मिळाली. तर काही चिमुकले पहिल्यांदाच आई-वडिलांना सोडून राहणार असल्याने रडवेल्या चेहऱ्यांनी त्यांनी आई-बाबांना “बाय-बाय’ केले.
समग्र शिक्षा अभियानातंर्गत शहरातील महापालिका शाळा, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित अशा एकूण 284 शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. बालभारतीकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 6 लाख 39 हजार 594 पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके वितरित करता यावा, यासाठी 3 ते 11 जून या कालावधीत शाळांचे मुख्याध्यापक पाठ्यपुस्तक घेऊन गेले होते. कुदळवाडी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

महापौर राहुल जाधव, अश्‍विनी जाधव, दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव यादव, संतोष जाधव, गोरबा शेळके उपस्थित होते. महापौर जाधव यांनी कुदळवाडी शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम येत्या सहा महिन्यांमध्ये शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार अत्याधुनिक डिजिटल सोयी-सुविधांयुक्त पूर्ण करण्याचा मानस व्यक्‍त केला. कार्यादेश देणे बाकी सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे म्हणाले की, महापालिका, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात आली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी द्यावयाच्या शालेय साहित्यासाठी अद्याप कार्यादेश देणे बाकी आहे. त्यामुळे संबंधित साहित्याचे वाटप झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.