सातारा, (प्रतिनिधी)- गणेशोत्सव दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती घडवण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे. आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात कुंभार बांधवांचे हात गुंतले आहेत.
शहरासह जिल्ह्यातील कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेशमूर्ती बनवण्याची हातघाई दिसू लागली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसबरोबरच घरगुती पूजेसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यंदा डायमंड, फेटा व धोतर रेडिमेड नेसवलेल्या गणेश मूर्तीना बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
उत्सवाला अवघा एक महिना राहिल्याने कुंभार बांधवांच्या घराघरांत, कारखान्यांत वेगवेगळ्या स्वरूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आकाराला येत आहेत. सध्या तयार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे.
घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूतीचे कोरीव काम केले जात आहे तर अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठवल्या जात आहेत. मोजक्या घरांमध्ये मूर्तीचे रंगकाम सुरू झाले आहे. शहरात काही ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल लागले आहे.
यावर्षी घरगुती मूर्ती या एक फुटांपासून ते तीन फुटांपर्यत आहेत. शाडू मातीच्या मूर्तीची यंदा संख्या वाढली आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मूर्ती तयार करण्यात येत आहेत.
ऑर्डरनुसार रंगकाम करून मूर्ती आकर्षक करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील मंगळवार पेठेतील शाहू कलामंदिरानजीकच्या श्री गवई विठ्ठल मंदिरामध्ये पुणे येथील उरुळी कांचन येथून गणेश मूर्ती आल्या आहेत.
श्री बालाजी रूप, माखन चोर, दहीहंडी फोडणारा, सिंहासनावर बसलेला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, विठ्ठल मूर्तीतील गणेश, गरुड, मोरासोबत खेळताना अशा अनेकविध प्रकारच्या गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या आहेत.
विविध प्रकारच्या मूर्तींचे आकर्षण
प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तीना मागणी वाढली आहे.
लालबाग, दगडूशेठ, मोरावरील गणेश, तुतारीवरील गणेश, झोपाळा गणेश, स्वामी समर्थ अवतार, चौरंग गणेश अशा फेटा, घोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्तीना सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
तर फेटाधारी, जय मल्हार, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मूर्तीना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे.