पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केळीची निर्यात वाढली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात होणारी केळीची आवक निम्म्याने घटली आहे. त्यातच श्रावणातील उपवासामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.
त्यामुळे घाऊक बाजारात केळीच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही डझनामागे सुमारे २० रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
बाजारात सोलापूर, फलटण, अकलूज, नातेपुते, बारामती येथून सर्वाधिक आवक होत आहे. जळगाव येथून होणारी आवक कमी झाली आहे. बाजारात रोज ५० ते ६० टन केळीची आवक होत आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हीच आवक दररोज ८० ते १०० टन केळीची आवक होती होती.
घाऊक बाजारात कच्च्या केळीला प्रतिकिलो १५ ते १८ रुपये भाव मिळत आहे, तर तयार मालाच्या १८ किलोच्या कॅरेटला ४०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. निर्यात वाढली असल्याने बाजारात आवक वाढण्याची शक्यता कमीच असल्याचेही व्यापार्यांनी नमूद केले.
चांगल्या प्रतीच्या केळीची निर्यात केली जात आहे. निर्यातदार जागेवरच केळी खरेदी करत असल्यामुळे दुसर्या क्रमाकांचा माल स्थानिक बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यातच ग्राहकांकडून केळीला अधिक मागणी असल्याने हलक्या प्रतीच्या केळीलाही जास्तीचा भाव मिळत आहे.
किरकोळ बाजारात एक डझन केळीचा भाव ५० ते ८० रुपये झाला आहे. इतर वेळी ५० रुपयात चांगल्या प्रतीची केळी ग्राहकांना मिळत असत. जोपर्यंत बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत दरात घट होणार नसल्याचेही व्यापार्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील केळीला मागणी कमी
पुणे जिल्ह्यातही केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, जिल्ह्यातून येणार्या केळीला इतर जिल्ह्यातील केळीप्रमाणे रंग येत नाही. त्यामुळे या केळीला विक्रेते, तसेच ग्राहकांकडून मागणी होत नाही.
सद्य:स्थितीत मार्केट यार्डातील केळी बाजारात बारामती आणि जुन्नर भागांतून केळीची आवक होत आहे. सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यांतील केळीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील केळीला मागणी कमी आहे, असे व्यापारी विठ्ठल वायकर यांनी सांगितले.