शिरवळमध्ये दीड लाखांची रोकड ताब्यात

निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाची कारवाई

शिरवळ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत असून शिंदेवाडी, ता. खंडाळा याठिकाणी शिरवळ – खंडाळा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान धडक कारवाई करत पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे निघालेल्या खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीकडून एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. या धडक कारवाईमुळे खंडाळा तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. शंकर धोंडीराम चक्के (रा. नागठाणे) या व्यक्तीकडून संबंधित रक्कम ताब्यात घेण्यात आली असून संबंधित व्यक्ती हा चित्रपटसृष्टीत व मालिकांमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शिरवळ-खंडाळा पोलिसांनी संबंधित रक्कम पंचनामा करत निवडणूक आयोगाचे स्थिर पथक प्रमुख शाखा अभियंता पांडुरंग मस्तूद यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आली असून याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरु आहे.

आशियाई महामार्गावर शिंदेवाडी ता. खंडाळा याठिकाणी नाकाबंदी करत शिरवळ पोलीसांकडून वाहनांची तपासणी मोहीम राबवत होते. यादरम्यान, पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे निघालेली खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनातून नागठाणे येथील शंकर धोंडीराम चक्के हे प्रवास करत असताना वाहनांची तपासणी करत असताना संबंधित व्यक्तीच्या बॅगेची तपासणी पथकाने केली असता बॅगेमध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. यावेळी पोलिसांनी व पथकाने शंकर चक्के यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने शिरवळ व खंडाळा पोलिसांनी संबंधित एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेत निवडणूक आयोगाचे स्थिर पथक प्रमुख पांडुरंग मस्तूद यांच्या पथकांच्या ताब्यात दिली.

याबाबत प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून याबाबत संबंधितांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाचे स्थिर पथकप्रमुख पांडुरंग मस्तूद यांनी दिली. या घटनेमुळे खंडाळा तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. यावेळी घटनास्थळी सातारा अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.