नवी दिल्ली: सीमेवर चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने अमेरिकेकडून 72 हजार रायफली मागवण्याचे निश्चित केले आहे. भारतीय लष्कराने यापूर्वीच मागवलेल्या 72 हजार रायफली यापूर्वीच लष्करापर्यंत पोहोचल्या आहेत.
यानंतर मागवण्यात आलेल्या आणखी 72 हजार रायफलीदेखील लवकरच उपलब्ध होतील. या रायफली उत्तर विभाग आणि प्रत्यक्ष कृतीच्या भागामध्ये पोहोचवल्या जाणार आहेत. सशस्त्र दलांना उपलब्ध असलेल्या वित्तीय अधिकारातून या रायफलींची ऑर्डर देण्यात येत आहे, असे संरक्षण सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
दहशतवाद विरोधी कारवाईसाठी भारतीय लष्करासाठी या सिग सॉर रायफली मागवण्यात आल्या आहेत. वेगवान खरेदी प्रक्रियेंतर्गत या रायफलींची खरेदी करण्यात आली आहे. या रायफली आता ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डकडून तयार केलेल्या “इंडियन स्मॉल आर्म सिस्टीम’ (इन्सॅन)रायफलींच्या जागेवर वापरात येतील. या रायफलींच्या खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सध्या या प्रक्रियेतील काही औपचारिक गोष्टींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.
भारतीय लष्कराकडून गेल्या काही वर्षांपासून “इन्सॅन’ रायफलींना बदलण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही ना काही कारणामुळे हे प्रयत्न अयशस्वी होत राहिले आहेत. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने इस्राईलला 16 हजार लाईट मशिन गनची ऑर्डर दिली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणावाची स्थिती आहे. लडाखच्या सीमेवर चीनचे 20 हजार सैन्य तैनात आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार चीनचे सैन्य प्रत्यक्ष ताबारेषेपासून 2 किलोमीटर मागे सरकले असले, तरी या भागात अजूनही चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित आहे.