लेह मधील रुग्णालयावरील आक्षेप लष्कराने फेटाळले, आरोप द्वेषभावनेने प्रेरीत आणि असमर्थनीय

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षादरम्यान जखमी झालेल्या सैनिकांची पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी लेह मधील ज्या रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्या रुग्णालयावरचे आक्षेप भारतीय लष्कराने शनिवारी फेटाळून लावले. हे आक्षेप पूर्णपणे द्वेषभावनेने प्रेरित आणि समर्थन न करता येण्याजोगे असल्याचे लष्कराने म्हटले आहे. आपल्या सशस्त्र दलाच्या जवानांना मिळणाऱ्या वागणूकीवर चिखलफेक करण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. लष्करातील जवानांवर सर्वोत्तम उपचार केले जात असतात, असे लष्कराच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चीनबरोबर सीमेवर तणाव निर्माण झाल्यावर भारताच्या भूमिकेतील ठामपणा दर्शवण्यासाठी पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट दिली होती. जखमी जवानांवर ज्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत, तेथेही जाऊन पंतप्रधानांनी जवानांबरोबर संवाद साधला. जवानांच्या शौर्यातून भविष्यात अनेकांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधानांनी या जवानांना सांगितले होते. या रुग्णालयातील मोदी यांचे जखमी जवानांशी संवाद साधत असतानाचे फोटो प्रसिद्ध झाल्यावर ट्‌विटरवर कॉमेंट पोस्ट व्हायला लागल्या होत्या. हे ठिकाण म्हणजे रुग्णालय वाटतच नाही. इथे मेडिसीन कॅबिनेट, इंट्राव्हेन्स स्टॅन्ड आणि अन्य वैद्यकीय उपकरणेही दिसत नव्हती, असे या पोस्टमध्ये म्हटले गेलेले आहे.

मात्र हे आक्षेप पूर्णपणे द्वेषभावनेने प्रेरित आणि असमर्थनीय असे आहेत. लेहमधील हे 100 खाटांचे रुग्णालय म्हणजे आपत्तीकालीन सुविधेचे विस्तारीत रुप आहे. हे रुग्णालय जनरल हॉस्पिटल कॉम्प्लेक्‍सचाच भाग आहे. कोविड-19 च्या पार्श्‍वभुमीवरील खबरदारीमुळे या रुग्णालयातील काही वॉर्डचे रुपांतर विलगीकरण सुविधांमध्ये करण्यात आलेले आहे. या हॉस्पिटलचे रुपांतर कोविड-19 वरील उपचारासाठीचे विशेष रुग्णालय करण्यात येणार आहे. त्यामुळे एरवी ऑडिओ व्हिडीओ हॉल म्हणून वापरला जाणाऱ्या हॉलचे रुपांतर वॉर्डमध्ये करण्यात आलेले आहे, असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.

कोविड भागापासून दूर ठेवण्यासाठीच गलवानमधील घटनेनंतर जखमी सैनिकांना इथे आणण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांनीही जखमी जवानांची भेट घेण्यासाठी या रुग्णालयाला भेट दिली आहे, असेही लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.

पूर्व लडाखमध्ये अनेक ठिकाणी गेल्या सात आठवड्यांपासून भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणावाची स्थिती आहे. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झाले होते. या संघर्षादरम्यान चीनचीही जीवितहानी झाली आहे. मात्र त्याचा तपशील उघड केला गेलेला नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.