अबाऊट टर्न: युक्‍तिवाद…

हिमांशू

युक्‍तिवाद केवळ कोर्टातच केले जातात आणि कोर्टात जे युक्‍तिवाद केले जातात ते न्यायदानाच्या दृष्टीनं पुरेसं गांभीर्य राखूनच केले जातात, हे दोन्ही गैरसमजच ठरले अखेर! आपल्यासारखे कुणाच्या खिजगणतीतही नसलेले सामान्य लोक युक्‍तिवाद गांभीर्यानं घेत असतील; पण ज्यांच्या मागे-पुढे माध्यमांचे कॅमेरे आणि बूम फिरत असतात, ते बरंच काही घडूनसुद्धा जणू काही घडलंच नाही, असं सांगत राहतात. त्याला छान प्रसिद्धीही मिळते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणसानं नेता किंवा सेलिब्रिटीच असायला हवं अशीही अट हल्ली नाही.

भलीमोठ्ठी रक्‍कम कर्ज बुडवून देश सोडून जाणाऱ्यांनासुद्धा तपास यंत्रणांच्या आधी माध्यमांचे कॅमेरे शोधून काढतात. नंतर अटक होते, जामीन नाकारला जातो… प्रत्येक गोष्टीची बातमी होते. नीरव मोदीला असंच माध्यमांनी तपास यंत्रणांच्या आधी शोधून काढलं. नंतर त्याला अटक झाली. एकदा सोडून दोनदा जामिनावर युक्‍तिवाद झाले. दुसऱ्यांदा नीरवच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टालाही थक्क करणारं कारण सांगितलं. नीरवनं त्याच्या मुलाला अमेरिकेत शिकायला पाठवलंय. इंग्लंडमध्ये नीरव एकटाच कसा राहणार? म्हणून त्यानं एक कुत्रा पाळलाय. आता जर नीरवला भारतात पाठवलं, तर त्या कुत्र्याचं काय होणार? असा प्रश्‍न चक्क कोर्टात उपस्थित केला. शिवाय, नीरवला इंग्लंडमध्येच राहायचंय म्हणूनच त्यानं इतर कोणत्याही देशांत नागरिकत्वासाठी अर्ज केलेला नाही, असाही युक्‍तिवाद केला.

याचा अर्थ नीरवची “इच्छा’ आणि “गरज’ या गोष्टी लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करावा, असं त्याच्या वकिलांचं म्हणणं! कोर्टानं ते अर्थातच ऐकलं नाही. उलट विनोदी वातावरण निर्माण झालंच होतं, त्याचा फायदा घेऊन कोर्टानंही काही गमतीदार प्रश्‍न विचारले. “नीरवला भारताच्या ताब्यात दिलं तर त्याला आणि विजय मल्ल्याला एकाच कोठडीत ठेवणार का?’ अशी विचारणा करून कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला. मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर तर डिसेंबरमध्येच कोर्टानं शिक्‍कामोर्तब केलंय. हा आदेश ज्या न्यायाधीशांनी दिला, त्यांच्यासमोरच नीरवचा अर्ज आला होता.

मल्ल्या प्रत्यक्ष भारतात कधी येणार, याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे; पण कोर्टाचा आदेश झाल्यानंतरसुद्धा मल्ल्या ट्‌विटरवरून जी “बॅटिंग’ करतोय, त्याला तोड नाही. त्याच्या मते, 1992 पासून तो ब्रिटनमध्येच राहत असल्यामुळं त्याला “फरारी’ म्हणता येत नाही. परवा तर त्यानं पंतप्रधानांच्याच कोर्टात चेंडू टाकला. “”मी थकवलेलं सगळं कर्ज वसूल केल्याचं पंतप्रधानांनीच मुलाखतीत सांगितलंय. तरीही मला लक्ष्य का करता?” असा प्रश्‍न त्यानं सत्ताधाऱ्यांना विचारलाय. आपण नऊ हजार कोटींचं कर्ज थकवलं आणि आपली 14 हजार कोटींची मालमत्ता जप्त केल्याचं पंतप्रधानांनीच जाहीर केलंय; त्यामुळं आपल्याला कुणी “फरारी’ म्हणूच शकत नाही, असं त्याचं म्हणणं.

अशा बातम्या ऑनलाइन वाचणारे आमचे “सोशलवीर’ या भन्नाट युक्‍तिवादांवर ज्या प्रतिक्रिया देतात, त्या सगळ्या सांगण्यासारख्या नसतात; पण कधीकधी त्या इंटरेस्टिंग असतात. नीरव मोदीच्या वकिलांनी कोर्टात श्‍वानपुराण सांगितलं, तेव्हा एका बहाद्दरानं “कुत्र्याच्या प्रत्यार्पणासाठीही अर्ज करा,’ असा सल्ला दिला. परंतु प्रमाणापेक्षा जास्त वसुली करूनसुद्धा आपल्याला “पोस्टरबॉय’ बनवल्याच्या मल्ल्याच्या आरोपावर काय बोलणार? या गोष्टी त्यानं कोर्टात सांगितल्या का? असल्यास त्या कोर्टाला का पटल्या नाहीत? हे प्रश्‍न महत्त्वाचे!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.