मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. हा वाद एवढ्यातच थंडावेल असं वाटत नाही. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांतही उर्फीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तसेच, उर्फी जावेदवर महिला आयोग का कारवाई करत नाही? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारला आहे. अश्यातच आता अभिनेत्री उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (दि. 13) उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याचप्रकरणी आता उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांची भेट घेत मला मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता या भेटीनंतर हा वाद आणखी किती चिघळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.