इलाका हमारा है लेकीन…

कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने कॉंग्रेसभवनात मंगळवारी एकत्र बैठक घेतली. त्यावेळी कॉंग्रेस भवनाच्या प्रांगणात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला मोहन जोशी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुख्यत्त्वे अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक होती.

निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आता गळ्यात गळे घालून लढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळेच ते एकत्र आले होते. मात्र, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी “तुम्ही आमच्या इलाक्‍यात आला आहात’ हे दर्शवण्यासाठी एकही संधी ठेवली नाही. मान्यवरांच्या भाषणाला सुरुवात झाली तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याने आधी स्वपक्षाच्या आपल्या नेत्यांची नावांची भाषणासाठी नावे घेण्याला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे पाहिलेही नाही.

कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाल्यानंतर आता आपले नाव घेणार असे अजित पवारांना वाटले; पण सूत्रसंचालकाने कॉंग्रेसच्या महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांचे नाव घेतले. अजित पवार म्हणाले “अहो, मला बोलू द्या’ त्यावर सूत्रसंचालक म्हणाले, “आधी त्यांचे होऊ द्या’. यावर पवार गप्प बसले.

पटेल यांचे भाषण झाल्या झाल्या, त्या माईक सूत्रसंचालकाकडे देणार इतक्‍यात पवार उठले आणि त्यांनी तो माईक सूत्रसंचालकाच्या हातात जाण्याआधी स्वत:कडे घेतला आणि थेट भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. सूत्रसंचालक बिचारा “इलाका हमारा है लेकीन…..’ अशा अविर्भावात तोंडात मारल्यासारखे बसून राहिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.