मॉस्को – युक्रेनचे चार प्रांत शुक्रवारी रशियात समाविष्ट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कायदा झुगारून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्याविषयीची घोषणा केली. पुतिन यांनी युक्रेनपुढे शांतता चर्चेचा प्रस्ताव ठेवला. त्याचवेळी रशियात समाविष्ट झालेले प्रांत परत देण्याविषयी बोलणी होणार नसल्याचेही स्पष्ट केले.
युक्रेनचा बळकावलेला भूभाग रशियाशी जोडण्याला अनेक देशांनी कडाडून विरोध दर्शवला होता. पण, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता रशियाने ती प्रक्रिया पुढे नेली. त्यामुळे युक्रेनने नाटोचा सदस्य बनण्याचा निर्धार आणखी पक्का केला आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी जाहीर केले. रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सात महिन्यांपासून युद्ध सुरू आहे.