पुणे : मंडई येथील मेट्रोच्या खोदकामादरम्यान आढळलेली अवशेष पुरातत्व विभागातर्फे ताब्यात घेतली जाणार आहे. दरम्यान ही जीवाश्म अवशेष नाहीत. मात्र ती अगदी अलीकडील काळातीलदेखील नाही. त्यामुळेच इतिहासाच्या दृष्टीने ही महत्वाची, पुरातत्व विभागातर्फे त्याचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजीचे संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी दिली.
मंडई येथे मेट्रोच्या खोदकामादरम्यान पुरातन अवशेष सापडले असून, ती जीवाश्म असल्याची शक्यता वर्तविली जात असल्याची बातमी ‘प्रभात’ने दिली होती. त्यानंतर गुरूवारी (दि.26) सकाळी पुरातत्व विभागाचे संशोधक आणि इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी या ठिकाणाची तसेच अवशेषांची पाहणी केली.
त्याबाबत डॉ. जोशी म्हणाले, ‘ही अवशेष 10 मीटर खोलावर सापडली असल्याने, ती पुरातन असू शकतात असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र ही अवशेष 10 फूट खोलावर सापडली असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच या अवशेषाकडे पाहिल्यास ती हलक्या स्वरूपाची असून, तब्बल 200 वर्षापूर्वीची असून, प्राण्याची विशेषत: हत्तीची असतील असे वाटते. ही हाडे ज्या मातीत सापडली ती माती उपलब्ध नसल्याने, त्याबद्दल निश्चित कालखंड आताच सांगता येणार नाही. मात्र ऐतिहासिकदृष्टया ही महत्वाची आहे
हे नक्की’, असे त्यांनी सांगितले.
या अवशेषांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी तसेच या अवशेषांचे जतन करण्याच्या हेतुने राज्याच्या पुरातत्व विभागाकडून ती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आजच त्यासंदर्भातील पत्र मेट्रो प्रशासनाला
दिले जाणार असून, त्यानंतर ती हाडे विभागाकडे सुपुर्द केली जातील.
मेट्रो प्राधिकरणाने पुरातत्व विभागाशी समन्वय साधावा
मेट्रोच्या कामादरम्यान यापूर्वी भुयार सापडले आहे. तसेच आता हे अवशेष सापडले आहे. या दोन्ही गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहे. त्यामुळेच मेट्रो प्राधिकरणाने बांधकाम करताना, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना किमान पाहणीसाठी बोलावले पाहिजे. इतक्या खोलवर खोदाई होत असताना, मातीची रचना देखील महत्वाची असते. त्यामुळे ती पाहूनही अनेक ऐतिहासिक घटनांची माहिती मिळू शकते. त्यामुळेच या पुढील काळात मेट्रो प्रशासनाने पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा, अशी भावना देखील डॉ. जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.