रेशन कार्ड एकाच दिवसात वितरित होणार : शेकडो तक्रारीमुळे हवेली तहसीलची घोषणा
थेऊर -हवेली तालुक्यात रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेकामी एजंट लोकांची लुडबूड पुरवठा विभागात वाढली आहे. याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याने स्वतः अर्जदार आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहिल्यास फक्त एकाच दिवसामध्ये रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा हवेली तहसील कार्यालयातून करण्यात आली आहे.
बनावट रेशन कार्ड तयार करण्याचे रॅकेट मध्यंतरी शहराच्या भागात उघडकीस आले होते. यामधून हवेलीतील बनावट रेशन कार्डचा वापर दिवाणी न्यायालयात जामीन मिळविणेकमी करत असल्याचा अनुचित प्रकार समोर आला होता. याकामी वेगळीच टोळी कार्यरत असल्याचे समोर आले होते. बनावट दाखले व बनावट रेशन कार्डवरून हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी नायब तहसीलदार व अव्वल कारकून यांनी आपले जबाब नोंदवून यातील खासगी गैरकारभार उघडकीस आणला होता.
हवेली तहसील कार्यालयातही काही खासगी एजंट एका रेशन कार्डसाठी दोन हजार रुपये घेत असल्याची चर्चा व तक्रारी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. पर्यायाने पुरवठा विभागाला एजंट लोकांचा विळखा पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर रेशन कार्ड मिळत नव्हते. अनेक नागरिकांची एजंटाकडून आर्थिक फसवणूक झाल्याने काहीजणांनी हा गंभीर प्रकार पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता.
याबाबत महसूल नायब तहसीलदार संजय भोसले, पुरवठा निरीक्षक रविंद्र दळवी, अव्वल कारकून सतीश उचाळे यांनी तातडीने संबधित कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून याविषयी तातडीने दखल घेत नागरिकांना सर्वोत्तम सेवा देणेकामी एजंटाची साखळी हटवण्याची योजना राबवली. त्यामुळे नागरिकांनाही वेळेत शिधापत्रिका मिळत असल्याने नागरिकांनी समाधान
व्यक्त केले.
आवश्यक कागदपत्रासह अर्जदार स्वत: उपस्थित राहिल्यास एकाच दिवसांमध्ये रेशनग कार्ड वितरित करीत आहोत. फक्त बाहेरील जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील नागरिकांची मागणी असल्यास त्यांचे मूळगावी असलेले रेशन कार्ड रद्द केल्याचा दाखला पाहूनच रेशनिंग कार्ड देत आहोत. जेणेकरून दुबार रेशन कार्ड एकाच व्यक्तीच्या नावे दोन ठिकाणी असू नये. नागरिकांनी याकामी कोणत्याही खासगी एजंटची मदत घेऊ नये व शासकीय फी व्यतिरिक्त पैसे देऊ नयेत. काही तक्रारी असल्यास त्यांनी पुरवठा निरीक्षक यांच्याकडे संपर्क साधावा.
– संजय भोसले, महसूल नायब तहसीलदार, हवेली