“रॉ’च्या अध्यक्षपदी सामंत यांची नियुक्ती

आयबीच्या संचालकपदी अरविंद कुमार

नवी दिल्ली – मोदी सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रिसर्च ऍन्ड ऍनालिसिस विंग (रॉ) च्या नव्या अध्यक्षांच्या नावांची आज घोषणा केली आहे. 1984च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत कुमार गोयल यांची रॉच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामंत कुमार गोयल यांनीच 26 फेब्रुवारीच्या बालाकोट एअर स्ट्राइकचे नियोजन केले होते. तर 1984च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची आयबीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

रॉचे प्रमुख अनिल कुमार धस्माना निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सामंत कुमार गोयल यांची नियुक्ती झाली आहे. गोयल हे पंजाब कॅडरचे 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एअर स्ट्राइकची कामगिरी यशस्वी केल्यामुळे आता सामंत गोयल हे रॉची धुरा यशस्वीपणे सांभाळतील, असा विश्वास मोदी सरकारला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला होता. यामध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
गोयल यांचा जन्म 13 जून 1960 चा. वयाच्या 24व्या वर्षी ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात होशियारपूर जिल्ह्यात गढशंकरमध्ये केली. त्यानंतर ते फिरोजपूर, गुरुदासपूर आणि अमृतसरचे एसपी होते.
भारत सरकारच्या सेवेत गोयल यांची पहिली नियुक्ती 2001 मध्ये झाली. कॅबिनेट सचिवायलयामध्ये काम केल्यानंतर ते गुप्तचर यंत्रणांचे मॉनिटरिंग करत होते. पंजाब पोलीस खात्याचे महासंचालक असताना गोयल यांनी सीमा व्यवस्थापन आणि गुप्तवार्ता विभागाची धुराही सांभाळली होती. आयबी आणि रॉ या दोन्ही यंत्रणांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

दरम्यान, आयबीचे नवे संचालक अरविंद कुमार यांचा काश्‍मीरप्रश्नी मोठा अभ्यास आहे. नवे सरकार काश्‍मीरप्रश्नी गंभीर असल्यानेच त्यांची आयबीच्या संचालकपदी नियुक्त केली असल्याचे बोलले जात आहे.
पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोधी पक्ष आणि माध्यमं सातत्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यामुळेच नव्या सरकारच्या स्थापनेनंतर सुरक्षेसंबधी त्वरीत पावले उचलली जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.