सातारा, (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीच्या अखेरच्या टप्प्यात वाटाघाटीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह घेऊन साताऱ्याच्या राजकीय रिंगणात उतरलेल्या अमित कदम यांनी आपल्या समर्थकांसह कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने अर्ज दाखल केला.
दुपारी १ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुधाकर भोसले व तहसीलदार नागेश गायकवाड यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी म्हणजे धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या लोक शक्तीची चळवळ आहे, अशी भावना अमित कदम यांनी यावेळी व्यक्त केली.
अमित कदम यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे पदाधिकारी हनुमंत चवरे, सागर भोगावकर, योगेश गोळे अमितदादांचे समर्थक सहकारी साधू चिकणे, माजी नगरसेवक बाळासाहेब बाबर, शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश अहिवळे, राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष दत्ताजी धनावडे, युवा नेते महेश शिर्के, रिपाइंचे दीपक सपकाळ उपस्थित होते.
कुबेर गणेश कॉलनी येथून अमित कदम यांनी मोजक्या समर्थकांसह शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून शाहू चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यानंतर पायी रॅली काढून अमित कदम यांनी प्रांत सुधाकर भोसले यांच्या समक्ष अर्ज दाखल केला. अमितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. या छोटेखानी रॅलीने सातारकरांची लक्ष वेधून घेतले. या रॅलीत म्हाते, केळघर, कुडाळ, करंजे, सावली, चोरांबे, कुडाळ, सोमर्डी, आरे दरे, गजवडी, कारी येथील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमित कदम म्हणाले, ही माझी उमेदवारी म्हणजे धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या लोकशक्तीची चळवळ आहे. प्रस्थापित जर रस्ते बांधणे पूल करणे म्हणजे विकास समजत असतील तर तो विकास नाही. विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये सातारा व जावळी तालुक्याचे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत.
शिवसैनिक मतदारसंघात चमत्कार घडवतील
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अमित कदम म्हणाले, ज्यांनी माझ्यावर सतत पक्षांतराचा आरोप केला, त्यांनी आपण नक्की काय केले? याचा आधी विचार करावा.
एखाद्याकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवावे. विकास म्हणजे ठेकेदारांना पोहोचण्याची व्यवस्था नाही, असा टोमणा त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. महाविकास आघाडी अभेद्य आहे.
तसेच सेनेतील कोणीही सहकारी नाराज नाही. मी सतत सर्वांच्या संपर्कात आहे. शिवसैनिक या मतदारसंघात परिवर्तनाचा चमत्कार घडवतील, असा विश्वास अमित कदम यांनी व्यक्त केला .