नैसर्गिक रंगांतूनच साकारा गणेशमूर्तीचे स्वरूप

शाहीर होनाजी बाळा यांनी श्रीगणेशाचे खूप सुंदर वर्णन केले आहे.
मस्तकी मुगुट, तेजाळते दोंद विशाळ,
तयावरी व्याळ कटि प्रति मिरवे।
पीतवर्ण वस्त्र कासेशी कशीले बरवे।।
कुंडले ती मकराकृती। श्रवणी तळपती,
फरशांकुर हाती मंडिलकर सखे।
चौसष्ट कळांचा लेख कोणा न करवे।।
मृगमद मुगुटी तळवटी, टिळक मळवटी,
केशरी उटी सर्वांग पिवळी दिसे अर्धचन्द्र शोभांकित कपोल युगुळी।।

श्री गणेशाचे हे वर्णन त्या मूर्तीवरील विविधांगी रंगछटांचे वर्णन करणारे आहे. गणेशाच्या मूर्ती पर्यावरणपूरक असाव्यात, अशी संकल्पना रूढ होत असताना शाडू किंवा लाल मातीचे गणपती की जे पाण्यात सहज विरघळतील, अशा स्वरूपात बनवणे महत्त्वाचे ठरते आहे. याचप्रमाणे गणपती मूर्तीवर दिले जाणारे रंगही पाण्यात विरघळणारेच असावेत, हेही तितकेच खरे आणि वास्तव आहे.

मूर्तीला लागणारे रंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यात ओले रंग किंवा ओले खडे (पोस्टर कलर), रंगपूड किंवा सुके खडे म्हणजे लेक कलर, ट्युब कलर आणि या व्यतिरिक्त सोनेरी, रूपेरी, तांबेरी असेही रंग वापरले जातात. मात्र, यामध्ये पर्यावरणपूरक रंगांचा विचार केला तर त्यात वॉटर कलर आणि घरातल्या घरात जे उपलब्ध असतील, असे रंग वापरले तर त्याचा मूर्ती विघटनावेळी योग्य तो
परिणाम आपल्याला मिळतो.

शाडूची किंवा लाल मातीची गणेशमूर्ती केल्यावर त्यावर आकर्षक रंग करण्यासाठी घरी उपलब्ध असलेले रंग म्हणजे हळद कुंकू, अष्टगंध, गेरू, कोळशाची पावडर, डिंक याबरोबरच विविध प्रकारच्या फुलांच्या
रंगांचा वापर करता येतो. हे रंग आकर्षकही दिसतात. पितांबर, शरीराचा रंग, केस यासाठी हे रंग वापरता येतात. यासाठी आधी डिस्टेंपरचा पांढरा रंग मूर्तीवर देऊन घ्यायचा. तो वाळल्यावर त्यावर वॉटर कलर किंवा इतर वर सांगितलेले रंग देता येतात. मुकुट किंवा इतर दागिने रंगविण्यासाठी सोनेरी किंवा
रूपेरी रंगाची पावडर टर्पेंटाइनच्या बेसवर वॉर्निशमध्ये मिसळून दिली तर या दागिन्यांना चमकदारपणाही येतो. या रंगांचे मातीबरोबर विघटन होते.

मूर्ती रंगकामासाठी एअर, पेनगन किंवा स्प्रे या माध्यमातूनही मूर्तीचे रंगकाम होते; पण घरी मूर्ती बनवताना एखाद्या मूर्तीसाठी ते परवडणारे नसते. यासाठी सिंथेटिक ब्रशचा वापर करतात. हे ब्रश वेगवेगळ्या पॉइंटच्या आकारात मिळतात. डोळे, सोंडेवरील बारीक नक्षी करण्यासाठी बारीक ब्रश वापरता येतात, तर मुख्य शरीराचा, केसांचा किंवा पितांबराचा रंग देण्यासाठी थोड्या मोठ्या आकाराचे ब्रश वापरतात.

शाडूची माती ही करड्या रंगाची असते, त्यामुळे या मातीच्या मूर्ती बनवल्यावर त्यावर रंगकाम केले तर आकर्षक दिसते; पण लाल मातीची किंवा पॅराकोटाची मूर्ती बनवली तर ती मुळातच लाल रंगाची असते, त्यामुळे या मूर्ती आहे त्या रंगातच आकर्षक दिसत असल्याने या मूर्तींवर सहसा रंगकाम केले जात नाही आणि केले तर ते केवळ दागिन्यांपुरते सोनेरी रंगाचे असते.

अलीकडच्या काळात अनेकवेळा मूर्ती बनवतानाच झाडांच्या कोरड्या बिया त्यात ठेवल्या जातात. त्यामुळे मूर्ती वॉटरकलरमध्ये रंगवून किंवा शक्‍य तो आहे त्याच स्थितीत ठेवून तिची दहा दिवस पूजा करून मग बागेत किंवा बादलीत पाणी घेऊन त्यात विसर्जन करण्याकडे नागरिकांचा कल आहे. ही
माती बागेतच वापरायची असल्याने तिच्यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक असू नयेत, यासाठी काळजी घेतली जात आहे. उत्सवाचे हे पर्यावरणपूरक स्वरूप आपल्या सर्वांसाठीच हीतकारक ठरणारे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.