खेड-शिवापूर (पुणे) – येथे झालेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने पुणे-सातारा महामार्गावरील वेळू फाटा ते कोंढणपूर फाटा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.
खेड-शिवापूर परिसरात आज (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे येथील वेळू फाटा (ता. भोर) ते कोंढणपूर फाटा (ता. हवेली) सेवा रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या वेळूफाटा ते कोंढणपूर फाटा सेवा रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या गटारींचे काम अपूर्ण असल्यामुळे या सेवा रस्त्यावर नेहमीच थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचते. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे अधिक पाणी साचल्याने वाहने चालवणे कठीण झाले होते. या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाणही मोठे आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने हे खड्डे दिसत नव्हते, त्यामुळे वाहनचालकांना गाड्या चालवणे धोक्याचे झाले होते. सातत्याने या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने हे काम त्वरीत व्हावे, अशी येथील नागरिकांची आणि प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान आज झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.