पुणेः जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभ्यास करत नाही याचा राग मनात धरुन बापानेच पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हा लपण्यासाठी मोठा प्लॅन देखील आखल्याची माहिती मिळत आहे.
१४ जानेवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पियुष (वय ९ वर्ष) घरात असताना त्याचे वडील विजय भंडवलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी ओरडा केला. यानंतर तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांची पत्नी शालन विजय भंडलकर देखील तिथे होती.
या प्रकरणी पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.
चक्कर आल्याची बतावणी
धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी एक प्लॅन तयार केला होता. त्यानुसार संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील एका डॅाक्टरांकडे नेले. तिथे मुलाला चक्कर आल्याचे डॅाक्टरांना सांगितले. त्यानंतर डॅाक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक केंद्रात नेण्यास सांगितले. त्या तिघांनी अत्यंतविधीची देखील तयारी केली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे मयत मुलाची आई शालन भंडलकर हिने सांगितले.