मंचर (प्रतिनिधी) – डॉ. महेश गुडे आणि त्यांची पत्नी डॉ. अलकनंदा गुडे यांचे मंचर उपजिल्हा रुग्णालयात पुष्पवृष्टी करून रुग्ण आणि डॉक्टरांनी सोमवारी (दि. 8 ) स्वागत केले. सुमारे अडीच महिने डॉ. गुडे दाम्पत्य करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे येथील डॉ. नायडू रुग्णालयात कार्यरत होते. त्यांनी सुमारे 250 पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. महेश गुडे आणि अलकनंदा कार्यरत आहे. करोना संदर्भात उपचार करण्यासाठी पुणे येथे येणार का? असे त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विचारले. त्यानुसार डॉ. गुडे दाम्पत्य डॉ. नायडू हॉस्पिटल येथे करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दाखल झाले. वृद्ध आई, वडील, 6 वर्षांचा मुलगा, 11 वर्षांची मुलगी यांना घरी ठेवून सुमारे अडीच महिने या दाम्पत्याने रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले.
त्यांनतर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ. गुडे पती पत्नीचे फुलांची उधळण करुन शरद बॅकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,उद्योजक अजय घुले, रुग्ण हक्क कल्याण समितीचे सदस्य डी. के.वळसे पाटील, जगदिश घिसे, डॉ. भुषण साळी, डॉ. दिप्ती साळी, डॉ. वर्षाराणी गाडे, डॉ. दत्ता चासकर, ऍड. बाळासाहेब पोखरकर, डॉ. सुहास कहडणे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. गणेश पवार तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी,परिचारिका आणि रुग्णांनी टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला.