शिक्षण आयुक्तांनी शासनाला पाठवला अहवाल
विभागीय शिक्षण उपसंचालक
कार्यालयातील भ्रष्ट कारभार उघड
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे शिक्षण विभागालाच मोठा कलंक लागला आहे. शिक्षण आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठविला आहे. त्यानुसार सहायक संचालक व प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेऊन त्यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. अहिरे यांच्यासह मनमानी कारभार करत मक्तेदारी झालेल्या बड्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून शिक्षकांच्या विविध प्रकरणांवर तात्काळ निर्णय होत नसल्याची बाब अनेकदा उघडकीच आली आहे. आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय फायलींवर निर्णयच होत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कार्यालयांवर सतत “वॉच’ही ठेवला होता. गेल्या शुक्रवारी कार्यालयातील शिपाई राजू खांदवे याला 26 हजार रुपयांची लाच स्वीकारताना “एसीबी’ने अटक केली. शिक्षण विभागाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे टीकाही झाली. शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी प्रवीण अहिरे यांच्या नियमबाह्य कामकाजाबाबत पुराव्यांसह मुख्यमंत्री, मुख्य सचिव, अपर सचिव, शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार करत त्यांच्या बदलीची मागणीही केली आहे. संभाजी ब्रिगेडनेही तक्रारी केलेल्या आहेत. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी तात्काळ संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सवीस्तर अहवाल मागविला होता.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीध अहिरे यांची बदली करण्यात यावी. याबरोबरच इतरही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या त्वरीत बदल्या करण्यात याव्यात, असे अहवालात म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात “छोटा मासा’ सापडला आहे. कार्यालयातील मोठे मासे मात्र अजून गळाला लागलेले नाहीत. मोठे मासे पकडण्यासाठी कारवाई होणार का? असे प्रश्नही उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.
आणखी काही बडे अधिकारीही जात्यात
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील गैरकारभाराबाबत दाखल झालेल्या तक्रारींनुसार व घडलेल्या प्रकारांचा शासनाकडे वस्तुस्थितीचा अहवाल पाठवलेला आहे. शासनाच्या आदेशानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील सर्वच कार्यालयातील भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी व कडक शिस्त लावण्यासाठी विशेष ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.