वाहतूक कोंडीचा त्रास रुग्णवाहिकेला

डांगे चौकात वाहनांच्या रांगा ः रुग्णवाहिका विरुद्ध दिशेने बाहेर काढली
पिंपरी : डांगे चौकात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. परंतु आता ही समस्या रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळू नये, इतकी गंभीर झाली आहे. थेरगाव – डांगे चौक येथे बुधवारी (दि. 26) वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे डांगे चौकापासून ग्रीन्सपर्यंत वाहनाची लांबच लांब रांग लागली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याची शक्‍यता निर्माण झाली. यामुळे रुग्णवाहिकेला उलट दिशेने बाहेर काढण्यात आले.

डांग चौक येथे बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पाऊण तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्याचवेळी चिंचवडकडून एक रुग्णवाहिका डांगे चौकाच्या दिशेने निघाली होती. समोरील वाहतूक कोंडी पाहता चालकाने ग्रीन्सच्या अलिकडेच रुग्णवाहिका विरूद्ध बाजूने डांगे चौकाकडे नेली. त्यामुळे ऍम्ब्युलन्सला मार्ग सापडला. थेरगाव सोशल फाउंडेशनने डांगे चौकातील वाहतूक कोंडी, आठवडे बाजार याविरूद्ध नुकतीच नागरिकांची स्वाक्षरी मोहीम घेतली. 1024 नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेत या मोहिमेला पाठिंबा दिला.

दरम्यान, आज झालेल्या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ फाउंडेशनच्या निलेश पिंगळे यांनी सोशल मिडियावर “शेअर’ करत समस्येच्या गांभिर्याकडे नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. डांगे चौकात महापालिकेकडून ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. त्याशिवाय, चौकातच मजूर अड्डा असल्याने मजूर जमलेले असतात. तसेच, चौकाच्या दोन्ही बाजूला फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि अन्य खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी रोजची समस्या झाली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.