चाकण – गेल्या दोन-तीन दिवसांपासून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना चाकण दंगलप्रकरणी अटक होणार अशा आशयाचे वृत्त प्रसार माध्यमातून आले. या कारवाई मागे आम्ही असल्याचे आरोप बिनबुडाचे व राजकिय द्वेषापोटी आहेत, असा खुलासा खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
30 जुलै 2018 रोजी झालेल्या चाकण दंगलीचे चौकशी पोलीस प्रशासनाने नियुक्त केलेल्या विशेष पथकाद्वारे (एसआयटी) होत असून तपासाअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करणे ही पोलिसांची कार्य पद्धती आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसल्याचे आमदार गोरे यांनी सांगितले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव व माझ्यावर करण्यात येणारे आरोप हे राजकीय द्वेष व अपुऱ्या माहितीवर आधारित असून याबाबत मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. या अटकेमागे माजी खासदार आढळराव व विद्यमान आमदार सुरेश गोरे यांचा कट असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने नुकतेच आरोप केले. त्या पार्श्वभूमीवर गोरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास घनवटे, पंचायत समिती माजी उपसभापती राजू जवळेकर, महेश शेवकरी, शेखर पिंगळे, राजू खेडकर आदी उपस्थित होते.