माझ्यावरचा आरोप हे विरोधकांचे षडयंत्र : आ. कांबळे

पुणे – निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि भाजपची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. संबंधित व्यक्तीला मी कधी भेटलोही नाही. न्यायालयात अर्ज करून माझ्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर प्रकिया पूर्ण केली जाईल आणि या षड्‌यंत्राचा तपास केला जाईल, असा खुलासा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केला आहे.

आरोप करणाऱ्या व्यक्तीने सन 2014 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे हा षड्‌यंत्राचाच भाग आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.

वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत 1 कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांविरुद्ध औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाला आहे. विलास दादाराव चव्हाण (रा. वडोद बुद्रुक, ता. खुलताबाद) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

कांबळे हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देतो असे आमिष दिलीप काशिनाथ काळभोर यांनी चव्हाण यांना दाखवले होते. त्या बदल्यात त्यांच्याकडे 2 कोटी 15 लाख रुपयांची मागणी केल्याचे चव्हाण यांनी फिर्यादित म्हटले आहे. चव्हाण यांनी काळभोर याला 1 कोटी 30 लाख रुपये दिले. मात्र, तरीही परवाना मिळत नसल्याने चव्हाण यांनी काळभोर यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यानंतर काळभोर यांनी काही धनादेश चव्हाण यांना दिले मात्र ते वठले नाहीत. त्यामुळे चव्हाण यांची फसवणूक झाली. चव्हाण यांची पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेतली नाही, त्यामुळे चव्हाण यांनी न्यायालयाकडे तक्रार दिली. त्यानंतर ही तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यानुसार ती दाखल करण्यात आली आहे.

हे मंत्रीमंडळ आहे की अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रीमंडळ आहे की, अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी? असा सवाल करत दिलीप कांबळे यांची हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. “चौकीदार ही चोर है’ ही घोषणा किती यथार्थ आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाकडे पाहिल्यावर समजून येते. राज्यातील कांबळे या मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी टोळीने लाचखोरी करून लोकांची लुबाडणूक केली जाते हे न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सिद्ध झाले आहे. जराही शरम वाटत असेल तर कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.