वडूज -वडूजमध्ये चार दिवसांपूर्वी दोन घरफोड्या झाल्या असतानाच रविवारी (दि. 29) रात्री 12 ते आज पहाटे चारच्या सुमारास बनियन, बर्मुडा घातलेले दहा ते पंधरा जणांचे टोळके चोरीच्या तयारीत असताना नागरिकांना दिसले. पोलीस व नागरिकांनी मिळून त्यांचा पाठलाग केला. नागरिकांच्या सतर्कतमुळे चोरट्यांचा मोठी चोरी करण्याचा डाव उधळला.
याबाबत माहिती अशी, करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वडूजचे नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. चार दिवसांपूर्वी शहरातील वाकेश्वर रोड व जोतिबा मंदिराच्या शेजारी असलेली दोन घरे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडली होती. लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताण असताना अशा चोऱ्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील अनेक घरांना कुलपे असल्याने चोरट्यांनी ही घरे लक्ष्य केली आहेत.
वाकेश्वर रस्त्यावर रविवारी रात्री बाराच्या सुमारास बनियन, बर्मुडा घातलेले दहा-पंधरा जणांच्या टोळके चोरीच्या तयारीत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी वडूज पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक पाटील, सपोनि मालोजीराव देशमुख, हवालदार नितीन निकम, संग्राम बाबर व नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला तरी ही टोळी त्यांच्या हाती लागली नाही.
पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला
बनियन व बर्मुडा घातलेले दहा ते पंधरा जणांचे टोळके दिसल्यावर नागरिकांनी वडूज पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे चोरट्यांनी पलायन केले. पोलीस वेळीच पोहोचल्याने अनर्थ टळला.