विमानतळ पुरंदरमध्येच

विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती : पर्यायी जागांची केवळ चाचपणी

पुणे – जिल्ह्यात प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर तालुक्‍यातच होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यात पाच जागांची पाहणी आणि सर्वेक्षण करून यातील सध्या प्रस्तावित केलेली सात गावांमधील जागा निश्‍चित केली आहे. मात्र, भूसंपादन करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी पुन्हा उर्वरित चार जागांची संरक्षण विभाग, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार असून याचा अहवाल तीन आठवड्यात शासनाला सादर केला जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

पुरंदर विमानळाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला. याबैठकीची माहिती राव यांनी पत्रकारांना दिली. यावेळी विभागीय आयुक्त राव म्हणाले की, विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील पाच जागांची पाहणी करून क्रमांक एकची जागा विमानतळासाठी योग्य आहे. या जागेला सर्व प्रमुख विभागांची मान्यता मिळालेली आहे. संरक्षण विभाग आणि हवाई दल यांनी सुद्धा या जागेला मान्यता दिलेली आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

भूसंपादन सुरू करण्यापूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या जागेसह अन्य पर्याय जागेंची पुन्हा एकदा हवाई दल आणि संरक्षण विभागांकडून तपासणी करून घ्यावी. तसेच भूसंपादन सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने मोबदल्यासंदर्भात जे चार पर्याय सुचविले आहेत. त्या पर्यायांचा फेरआढावा घेण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुन्हा उर्वरित चार जागांची पाहणी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना आकर्षक पॅकेज देणार…
भूसंपादनाचे पॅकेज अंतिम करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, याबाबींना प्राधान्य देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मोबदल्यांच्या सर्व पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ उभारताना दिलेले पॅकेज तसेच समृद्धी कॉरिडॉरसाठी देण्यात आलेले पॅकेज याचाही अभ्यास करून शेतकऱ्यांना आकर्षक पॅकेज दिले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.