पुणे -प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यामध्येच होणार आहे. मात्र, तो नव्या जागेत होणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच या जागेसंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे पांडेश्वर, रिसे आणि पिसे या गावांत विमानतळ होण्याच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
पुरंदर विमानतळासाठी सध्या असलेल्या जागेपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्वर, रिसे आणि पिसे जागेस एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडीयाने तत्वत: मान्यता दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ऍथारिटी, संरक्षण मंत्रालयसह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहे.
मात्र, या सातही गावांतील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध दर्शवला होता. या संदर्भात मध्यंतरी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यायी जागांचा विचार करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार पवार यांनी पर्यायी जागेचा विचार करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, सूचना प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार जगताप यांनी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सिंह यांनीदेखील पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार सध्या निश्चित केलेल्या जागेपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्वर, रिसे आणि पिसे या भागांतील पर्यायी जागेची चाचपणी करण्यात आली. त्यामध्ये विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ करताना कोणताही अडथळा येत नाही. तसेच विमानतळाच्या जागेत बदल केल्यानंतर लोहगाव येथील विमानतळावरील विमान उड्डाणांनादेखील कोणतीही अडचण येऊ शकत नाही, असे समोर आले आहे.
तसेच सध्याच्या जागेपासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरात विमानतळ हलविल्यास बहुतांश जागा शासकीय असल्यामुळे भूसंपादन सहज शक्य होईल. या सातही गावांतील बागयती क्षेत्र वाचण्यास मदत होऊ होईल, असा अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठविला होता.
विमानतळासाठी नवीन जागा जास्त उपयुक्त आहे. येथे खाचखळगे कमी आहेत. जास्त बागायती क्षेत्र नाही. तसेच गायरान जागा अधिक आहे. तसेच विमानांचे टेकऑफ आणि लॅंडिंगसाठी ही जागा अधिक चांगली आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा