स्पाईसजेटच्या दुर्घटनेनंतर डीजीसीएची घोषणा
मुंबई – स्पाइसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमान प्रवासादरम्यान उघडकीस आलेल्या घटनेवर विमान वाहतूक नियामक मंडळ कठोर झाले आहे. ही घटना डोळे उघडवणारी असल्याचे सांगत डिसीजीएने घोषणा केली, की आता विमानांची रात्री उड्डाणापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान विमानांमध्ये काही खराबी आढळून आल्यास ते विमान उड्डाण करू शकणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रविवार, 1 मे रोजी मुंबई-दुर्गापूर दरम्यानच्या स्पाईसजेटच्या विमानाला विमानतळावर उतरत असताना वादळाचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांचे समान प्रवाशांच्या अंगावर पडले. या घटनेत 3 क्रू मेंबर्ससह 17 प्रवासी जखमी झाले आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक अरुण कुमार यांनी स्पाइसजेट प्रकरणानंतर विमान तपासणी कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
डीजीसीएने म्हटले की, कमकुवत किंवा कालबाह्य भारतीय विमानांची देशातील प्रमुख विमानतळांवर तपासणी केली जाईल. या विमानांच्या दुरुस्तीसह रात्रीच्या वेळी विमानतळांवर उभ्या असलेल्या विमानांच्या केबिनचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर स्पाइसजेटच्या ताफ्यातील 70 विमानांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.