आंदोलन चिघळले ! शेतकरी लालकिल्ल्यात घुसले ;पोलीस-शेतकऱ्यांत संघर्ष

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या. दरम्यान, शेतकऱ्यांचा एक समूह ट्रॅक्टरमध्ये चढून लाल किल्ल्यात घुसला असल्याने या आंदोलनाला आता अतिसंवेदनशील वळण लागले असल्याचे दिसत आहे.

किसान मजदूर संघर्ष समितीमधील आंदोलक मुकरबा चौक येथे पोहोचले. तिथून या आंदोलकांनी कांजवाला येथे जाणे अपेक्षित होते. पण बॅरिकेडस मोडून हे शेतकरी आता रिंग रोडच्या दिशेने चालले.

या मोर्चाला हिंसक वळण लागले असून सात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्याही बातम्या येत आहे. पोलिसांकडून अश्रूधुर चालवण्याच्या बंदुकाही हिसकावून घेण्यात आल्या आहेत.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.


डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.