करोनाकाळात वाढला आंदोलनांचा जोर

पोलिसांचे दुर्लक्ष : परवानगीही देत नाही आणि कारवाईही करत नाही 

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच रोजचे मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा भीषण परिस्थितीतही सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बिनधास्तपणे आंदोलन करीत आहेत. यामुळे आगामी काळात करोनाचा आणखी प्रसार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पिंपरी पोलीस या आंदोलनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास कायद्याने मनाई आहे. यामुळे आपोआपच निदर्शने, आंदोलन, उपोषण अशांवर बंधने आली आहे. मात्र काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी शहरात आंदोलनाचा धडका लावला आहे. यापूर्वी चिनी मालावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणाऱ्या बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र त्यानंतर अनेक आंदोलने झाली, परंतु एकाही आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. सोमवारी देखील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन आंदोलने झाली. मात्र पोलिसांनी याबाबतही बघ्याची भूमिका घेतली आहे. प्रत्येक आंदोनलनात किमान दहापेक्षा अधिक आंदोलनकर्ते दिसून येत आहेत. परंतु पोलीस मात्र आंदोलनकर्ते पाचपेक्षा कमी असल्याचे सांगत आहेत.

रामजन्मभूमी पूजनाच्यावेळी देखील भाजपने आपल्या कार्यालयासमोर जल्लोष करीत लाडू वाटले होते. तसेच सर्वच पक्षांनी वेळोवेळी आंदोलने केली. याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध होऊनही पिंपरी पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल केला नाही.

कोणतेही आंदोलन करण्यासाठी पोलिसांनीकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आंदोलन करणाऱ्या संघटना पोलिसांना पत्र देतात. असे आंदोलनकर्ते पाचपेक्षा संख्येने कमी असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.
– मिलिंद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी

Leave A Reply

Your email address will not be published.