खेडच्या दक्षिण भागात प्रशासनाचे झोपेचे सोंग!

नागरिकांचा आरोप : करोनाचा झापाट्याने फैलाव; उपाययोजनांच्या नावाने बोंब

चिंबळी – खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील काही गावांच्या हद्दीत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना स्थानिक प्रशास मात्र, उपाययोजना करण्यात कुचराई करीत असून एकप्रकारे त्यांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चिंबळी, कुरूळी, निघोजे, मोई परिसरातील विविध भागांमध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक बाधितांची संख्या पोहोचली असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने परिसरात हिरवेगार गवत उगवल्याने डास, माश्‍या, चिलट्यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने साथींच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. मात्र, करोनाच्या धास्तीने खासगी डॉक्‍टर तपासणीस नकार देत आहेत. तर इतरांचे ऐकून नागरिक घरातच औषोधोपचारांवर भर देत आहेत. मात्र, घरीच औषोधोपचार करणे हे जीवावर बेतू शकते तसेच इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते घातक असल्याने खासगी डॉक्‍टरांना तपासणीच्या त्वरीत सूचना देण्यात याव्यात तसेच गावागावांत आरोग्य शिबिरे किंवा रॅपिड टेस्ट घ्याव्यात, अशी मागणी जोर धरीत आहे.

संबंधित ग्रामपंचायतींना औषध फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गावांमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रासही दिल्या आहेत. तसेच गावागावांमध्ये पुन्हा एकदा घरोघरी जावून सर्व्हेक्षण घेण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात येतील. यात जर कोणी कुचराई केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-अमर कांबळे, सदस्य, पंचायत समिती, खेड

चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई आदी गावांमध्ये किंवा परिसरात औद्योगिक वसाहतींमुळे गावागावांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, करोनामुळे कंपन्या ज्यावेळी बंद होत्या त्यावेळी हे नागरिक आपापल्या राज्यात पुन्हा गेल्या होत्या. पण, कंपन्या सुरू झाल्यानंतर हे कामगार परतले असून कंपन्या जोमाने सुरू आहेत. मात्र, या कामगारांना कंपन्यांमध्ये करोनाची लागण होत असून ते काहि कामानिमित्त स्थानिकांच्या संपर्कात येत असल्याने गावागावांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे कंपनीसह स्थानिक प्रशासनाने करोनारोखण्यासाठी उपाययोजा केल्या पाहिजे त्या होताना दिसत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. तर आपल्या परिसरात मृत्यूचा तांडाव सुरू झाल्यावर प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.