छत्रपती संभाजीनगर – संपूर्ण देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांबच्या पल्यासाठी रेल्वेमध्ये गर्दी असते. पण जी जवळची ठिकाणे आहेत, त्याठिकाणी जाण्यासाठीही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे एक्सप्रेस गाड्यांमध्ये देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नेहमी प्रवाशांनी भरलेल्या लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट, एक्स्प्रेसपूर्वी मेमू आणि डेमू रेल्वे छोट्या अंतरासाठी चालवण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड-मनमाड मार्गाचा समावेश केला आहे. नांदेड ते मनमाड मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकावरून ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुविधा होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे आता आरक्षित डब्यातून प्रवास करणारांवर आळा बसेल. प्रवाशांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नांदेड-मनमाड मार्गावरील प्रवाशांसाठी सोयीची नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, नगरसोल आदी स्थानकांवरील प्रवाशांना महत्त्वाच्या रेल्वेच्या पूर्वी मेमू चालवण्याचा निर्णय घेतला आहे.