कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरु

कोविड चाचणी करण्याचे प्रशासनाचे आदेश

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे देशात लोकांनी या महामारीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यातच कुंभमेळ्यात कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेण्याचे काम वर्धा जिल्हा मुख्यालयामार्फत सुरू झाले आहे.

पोलिसांनीही कुंभमेळ्यात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून केले आहे. वर्षभरापूर्वी तबलिगींच्या ‘मरकज’मधून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला बराच खटाटोप करावा लागला होता. आताही तसेच चित्र आहे.

हरिद्वार येथे संपन्न झालेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी झाली. वर्धा जिल्ह्यातूनही काही भाविक हरिद्वार येथे गेले आहेत. आता ही मंडळी मेळा आटोपून परतीच्या वाटेवर आहेत. त्यांची निश्चित संख्या पुढे आलेली नाही. जिल्ह्यात दरदिवशी करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात आता नव्याने भर पडू नये म्हणून सर्व ती काळजी शासनातर्फे घेतली जात आहे. भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वत:च करोना तपासणी करावी, तसेच गृह विलगीकरणात राहून नियमांचे तंतोतंत पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे म्हणाल्या, सध्या अशा भाविकांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्याबाबत माहिती घेतली जात आहे. उत्तराखंडला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरात वर्धेतील काही वाहून गेले होते. तर काही सुखरूप परतले होते. त्या अनुषंगाने माहिती काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.

वर्षभरापूर्वी तबलिगींच्या दिल्ली मेळाव्यातून परतलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाला बराच खटाटोप करावा लागला होता. करोना संक्रमण उद्भवल्यानंतर तबलिगींचा शोध घेण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे झाले होते. मात्र शेवटी तबलिगींच्या स्थानिक प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत खुलासा केल्याने आवाहन संपुष्टात आले. आता कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना शोधून त्यांची तपासणी व गृह विलगीकरणात पाठवण्याचे नवे आव्हान जिल्हा प्रशासनसमोर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.