“चॅरिटेबल ट्रस्ट’ टाळताहेत जबाबदारी
तळेगाव दाभाडे – “नॉन कोविड’ आणि “कोविड बाधित’ किंवा संशयित व्यक्तींना खासगी हॉस्पिटलमध्ये एकत्र ठेवणे शास्त्रीय दृष्टीने धोकादायक आहे. असे असताना मावळ तालुक्यातील जबाबदार प्रशासकीय अधिकारी उपलब्ध कोविड सेंटरची बेड क्षमता न वाढवता खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर दबाव टाकत आहेत, अशी माहिती संबंधित डॉक्टरांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना रविवारी (दि. 19) दिली.
लोणावळा येथे एकही शासकीय कोविड केंद्र नाही. तळेगाव दाभाडे येथील मायमरच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण हॉस्पिटलची 750 बेडची क्षमता असल्याचे डॉ. धनंजय जाधव आणि डॉ. दिलीप भोगे यांनी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांच्याकडे स्पष्ट केले होते. सध्या ग्रामीण रुग्णालयात केवळ 60 बेड आहेत. जिल्हाधिकारी राम यांनी बेडची क्षमता वाढविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पणन मंडळाच्या इमारतीमध्ये देखील करोना बाधितांसाठी उत्तम व्यवस्था पूर्ण क्षमतेने गेले दोन महिने सुरू आहे. अशी वस्तुस्थिती असताना खासगी रुग्णालयांवर दबाव आणून त्यांना कोविड केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी अशास्त्रीय निर्णय घेत आहेत.
याबाबत काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले, की कोविड सेंटर हे संपूर्णतः स्वतंत्र असले पाहिजे. ते सुरू करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स आणि स्टाफ उपलब्ध होत नाही. मूळ हॉस्पिटलमध्ये नेहमीच्या रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांना दिवसरात्र व्यस्त राहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे स्टाफला इच्छा असूनही हॉस्पिटलपर्यंत येण्या-जाण्याची सोय नाही. विशेषतः परिचारिका आणि अन्य महिलांना ते शक्य नाही.
रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि वाहन प्रवासाचे नवे नियम लादल्याने दुचाकीवरून देखील येणे अशक्य आहे. त्याशिवाय ते खर्चिक आहे, अशा स्थितीत आहे. त्या कोविड सेंटरमध्ये बेडसची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले, तर ते नागरिकांच्या आणि रुग्णांच्या हिताचे होईल.