‘झाडे लावली…परत नाही पाहिली’

लाखो रुपये खर्चाच्या वृक्षारोपणाची माहिती प्रशासनाकडे नाही

पुणे – लॉकडाऊनचा प्रभाव विविध गोष्टींवर झाला तसाच तो वृक्षारोपणावरही झाला आहे. संचारबंदी आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शहरात लागवड केलेल्या वृक्षांच्या जिवंतपणाची पाहणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून केलेल्या वृक्षारोपणाची सद्य:स्थिती काय आहे? याबाबत अचूक माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येते. लागवड केलेल्या या वृक्षांची ऑक्‍टोबर आणि मे या दोन महिन्यांत पाहणी केली जाते. या पाहणीद्वारे वृक्षांच्या सद्य:स्थितीबाबत अहवाल तयार केला जातो. गेल्यावर्षी तब्बल 80 हजार रोपांची लागवड केल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला होता. तसेच, ऑक्‍टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत लागवड केल्यापैकी सुमारे 90 टक्‍क्‍यांहून अधिक रोपे सुस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले होते.

मात्र, करोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत घराबाहेर पडण्यावर नागरिकांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. अशातच उपलब्ध मनुष्यबळापैकी बहुतांश जण हे आपत्ती निवारण कार्यासाठी कार्यरत असल्याने वृक्षारोपणाबाबत पाहणीच केली गेली नाही, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणातील एका सदस्याने दिली. त्यामुळे लागवड केलेल्या रोपांची सद्य:स्थिती काय याबाबत अचूक माहिती उपलब्ध नसल्याची खंत व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरणाची बैठक नुकतीच झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.