दुर्घटना घडूनही प्रशासनाला जाग येईना!

सोळूतील पुलाचे कठडे तुटले, स्लॅबदेखील कमकुवत : वाहनांची वर्दळ सुरुच

चिंबळी – मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध ठिकाणी भिंती कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीतहानीच्या घटना घडत आहेत. असे असताना राज्य शासन मात्र, अशा धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष करीत आहेत की काय असा प्रश्‍न निर्माण व्हावा असे चित्र सध्या आळंदी-मरकळ रस्त्यावर असणाऱ्या सोळू गावच्या हद्दीतील साकव पुलाच्या अवस्थेवरून दिसून
येत आहे.

मरकळ-आळंदी रस्त्यावर सोळू गावच्या अलीकडे वळणावरील ओढ्यावर हा पूल असून या पुलाचे दोन्ही बाजूने कठडे अर्धवट अवस्थेत तुटलेले आहेत. पुलाखालचे स्लॅब देखील कमकुवत झाले असून गज (सळई) उघड्या पडल्या आहेत. तर उभ्या खांबांचे दगड देखील निसटलेले आहेत, यामुळे पूल कमकुवत अवस्थेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. जर मोठा पाऊस आला आणि ओढ्याला पूर आल्यास पूल वाहून जाण्याची अथवा खचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या पुलावर दिवस-रात्र वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना देखील घडू शकते अशी भीती स्थानिक व्यक्‍त करीत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी एक अपघात झाला होता या अपघातात वाहन पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यात कोसळले होते, त्यांनतर अद्यापही या पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

पुलाच्या ठिकाणचे वळण धोकादायक आहे. याठिकाणी अपघात घडू नये याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. तर ओढ्यातील नैसर्गिक प्रवाह देखील बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली असून भविष्यात जर मोठी दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तरी पुलाचे ऑडिट करून त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांसह प्रवासी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)