दस्त नोंदणीसाठी ‘आधार’ पुरेसे

यापुढे साक्षीदारांची गरज नाही : नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केली सुविधा

पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन, सदनिका, दुकान आदींच्या खरेदी-विक्रीबाबत दस्त नोंदणी करताना आता साक्षीदारांची गरज राहणार नाही. कारण, खरेदी करणारा व विक्री करणारा यांच्याकडे आधार कार्ड असेल तर दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या सुविधेमुळे सुमारे 25 लाख नागरिकांना साक्षीदार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागणार नाही. त्यामुळे या कार्यालयातील गर्दीदेखील आपसूकच कमी होणार असून नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करताना आधार कार्ड असेल तर साक्षीदाराची आवश्‍यकता नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची आधार क्रमांकावरून ओळख पटविण्यासाठी इंटरनेटऐवजी नोंदणी विभागाच्या स्वतंत्र प्रणालीला ही सेवा देण्याचा प्रस्ताव नोंदणी विभागाकडून “युनिक आयडेंटिफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया’ला (यूआयडीएआय) सादर केला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. बायोमेट्रिक मशीनद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात येत आहे.

नोंदणी विभागाने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. त्यासाठी नोंदणी अधिनियमामध्ये काही बदल करणे आवश्‍यक होते. नोंदणी विभागाने यासाठीचे बदल करून त्याची अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे.

आधारची सत्यता पडताळण्यासाठी बायोमेट्रिक मशीनद्वारे अंगठ्याचे ठसे घेतले जाते. इंटरनेटद्वारे या ठश्‍यांचे नमुने “यूआयडी’च्या सर्व्हरवर जाऊन पडताळणी होते. यासाठी इंटरनेट हे माध्यम महत्त्वाचे आहे. मात्र, नोंदणी विभागाच्या इंटरनेटसाठी “एमपीएलएसव्हीपीएन’ हे स्वतंत्र नेटवर्क वापरले जाते. या नेटवर्कमुळे डेटा हा सुरक्षित राहतो.

रांगांच्या कटकटीतून नागरिकांची सुटका
दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधकांसमोर साक्षीदारांना आणणे, त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेणे, छायाचित्र, हमीपत्र आणि स्वाक्षरी घेणे ही प्रक्रिया करण्यात येते. मात्र, आधारमुळे साक्षीदार शोधणे, त्याला दस्त नोंदणी होईपर्यंत थांबविणे यातून नागरिकांची सुटका होणार आहे. प्रचलित पद्धतीनुसार दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी दोन साक्षीदार आणावे लागतात. या सुविधेमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात साक्षीदार आणण्याची आवश्‍यकता नाही.

खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींकडे आधार कार्ड असेल तर साक्षीदाराची गरज नाही. नोंदणी विभागाने नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची होणारी गर्दी कमी होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा वापर करावा यासाठी दुय्यम निबंधक यांना या नियमाची माहिती नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– अनिल कवडे, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.