पुणे : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे अभिनेत्रीला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. तिने सादर केलेल्या लावणीमुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या लावणीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत वैष्णवी पाटील आणि विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोध दर्शवला.”पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका”, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचे शुटिंग केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचे शूटिंग केले तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचे सांगण्यात येत आहे. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली.