जादा भाडे आकारल्याने पोलीस आणि परिवहन विभागाकडून पाऊल
पुणे – शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा दीडपटीपेक्षा जादा भाडे आकारणाऱ्या 45 खासगी ट्रॅव्हल्सवर संगमवाडी येथे वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने कारवाई केली आहे.
सरकारी नियमांनुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडे निश्चित केले होते. राज्य मंडळाच्या गाड्यांपेक्षा केवळ दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार खासगी ट्रॅव्हल्सचालकांना देण्यात आला आहे.
जादा भाडे आकारल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा वाहतूक विभागाकडून देण्यात आला होता. मात्र, या नियमांचे पालन न करता प्रवाशांकडून भाडे उकळणाऱ्या तब्बल 45 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ट्वीटर, व्हॉट्स ऍप आणि वाहतूक नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारीद्वारे ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील प्रवाशांकडून जादा प्रवास भाडे आकारल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
दिवाळीनिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. त्याचा फायदा घेऊन खासगी बसचालकांकडून भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली जाते. काही दिवसांपूर्वीच ट्रॅव्हल्सचालकांना सूचना देण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी “आरटीओ’ प्रशासनातील अधिकाऱ्यांसह ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक, चालक, बुकिंग एजंट उपस्थित होते.
येथे करता येणार तक्रार
जादा तिकीट आकारणे, योग्य सुविधा न पुरविणे यासह विविध तक्रारींसाठी वाहतूक पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. वाहतूक शाखेच्या 841-1800-100 या व्हॉट्सऍप क्रमांकावर, वाहतूक शाखेच्या 020-26685000 या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकासह “पुणे सीटी ट्रॅफिक’ या ट्वीटर अकाऊंटवर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे. तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (एमएच12महाट्रान्सकॉम.इन) या “ई-मेल’ वर तक्रार करता येणार आहे.