नवी दिल्ली : काही भ्रष्ट घटकांवरील कारवाईकडे कॉर्पोरेट क्षेत्राचे सरकारकडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याच्या रूपात पाहिले जाऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
सरकारच्या हेतूंबाबत काही शंका असल्यास सरकारबरोबर त्याचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते. उद्योगांनी कोणत्याही अडथळ्यांशिवाय पारदर्शक वातावरणात निर्भयपणे संपत्ती निर्माण करावी, त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात उद्योगांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्याचा सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. कर प्रणालीत पारदर्शकता, कार्यकुशलता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी आणि कर विभागातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. कंपन्यांमधील गुंतवणूकीला चालना मिळावी यासाठी कंपनी कर सर्वात कमी करण्यात आले आहेत. उद्योगांनी नैराश्य सोडून द्यावे.
भारतीय उद्योगांना जगातील कानाकोपऱ्यापर्यंत विस्तारण्यासाठी सरकार उद्योगक्षेत्राबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिल, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करण्याचे लक्ष्य 5 ट्रिलियन डॉलर्स इतकेच आहे आणि अंतिम उद्दिष्ट यापेक्षाही मोठे आणि जास्त व्यापक आहे, असेही ते म्हणाले.