आरोपींनाच संरक्षण सल्लागार म्हणून नेमले; राष्ट्रवादीची टीका

मुंबई: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधून निवडून आलेल्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान देण्यात आले आहे. वादग्रस्त असणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना समितीत सहभागी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर फेसबुक पोस्टव्दारे टीका केली आहे. आरोपींनाच संरक्षण सल्लागार म्हणून नेमून भारताची कोणती नवीन ओळख भाजपा निर्माण करत आहे? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले, भोपाळच्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान देण्याचा वादग्रस्त निर्णय भाजपा सरकारने घेतला. या निर्णयाबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव स्फोटातील आरोपी आहेत. त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला सुरू आहे.

२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबाबत ‘माझ्या शापामुळे करकरेंचा मृत्यू झाला’ अशी आक्षेपार्ह विधाने त्यांनी केलेली आहेत. या प्रज्ञा ठाकूरला संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत नेमून कोणती नवीन संरक्षण नीती भाजपा सरकार राबवू इच्छित आहे?, असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रसेन उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.