अत्याचाराच्या 80 टक्के घटनांतील आरोपी परप्रांतीय

मुंबई – राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या 80 टक्के घटनांमागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेने केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचवेळी मनसेकडून हा दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. 

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेबाबत गृहमंत्र्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय गुन्हेगार आहेत. 

राज ठाकरे यांनीच सर्वात आधी परप्रांतीयांच्या नोंदणीचा मुद्दा मांडला होता. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो, असं सांगतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर हे मतांचे राजकारण करण्यासाठी खटाटोप करत असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील महिला अत्याचारांच्या तक्रारीवर पोक्‍सो कायदा आणि शक्ती कायदा हा नागपूर अधिवेशनात राज्यात अंमलात आला पाहिजे. साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे केली आहे, असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.